पीटीआय, नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी दृष्टिकोन आशावादी बदल सुरू असून, आधी व्यक्त केलेल्या अंदाजात भर घालणारी सुधारणा करणाऱ्यांमध्ये आशियाई विकास बँकेची नव्याने भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर ६.७ टक्क्यांपुढील मजल गाठू शकेल, असा अंदाज ‘एडीबी’ने गुरुवारी वर्तविला असून, आधी व्यक्त केलेल्या ६.३ टक्के अंदाजात तिने तब्बल अर्धा टक्क्यांची आता वाढ केली आहे.
आशियाई अर्थव्यवस्थांविषयी विकास ‘एडीबी’ने गुरुवारी अहवाल जाहीर केला. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा दर ७.६ टक्के नोंदविण्यात आला. हा दर अपेक्षेपेक्षा जास्त नोंदविण्यात आला. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीतील विकास दर ७.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. या भक्कम कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराच्या आधीच्या ६.३ टक्क्यांचा अंदाजात वाढ करून तो ६.७ टक्क्यांवर नेण्यात आल्याचे तिने अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा : घाऊक महागाई दरात सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच वाढ, नोव्हेंबरमध्ये वाढदर शून्याखालील पातळीतून वर
विकासदराचा अंदाज ‘एडीबी’ने वाढवून घेतला असला तरी, संपूर्ण वर्षासाठी चलनवाढ अर्थात महागाई दराच्या सरासरी ५.५ टक्के अंदाजावर मात्र ती कायम आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी भांडवली खर्चात वाढ केली आहे. यामुळे गुंतवणुकीत वाढ होत आहे. खासगी भांडवली गुंतवणुकीतील कमी वाढ आणि अपेक्षेपेक्षा कमी निर्यात उत्पन्न यांचा परिणाम सरकारच्या भांडवली खर्चामुळे सौम्य केला आहे, असे अहवालाने नमूद केले आहे.
उद्योग क्षेत्राची भक्कम कामगिरी
आर्थिक आकडेवारी पाहिल्यास उद्योग क्षेत्राची दमदार वाढ होताना दिसत आहे. त्यात प्रामुख्याने निर्मिती, खाणकाम, बांधकाम आणि सुविधा या उद्योगांची दोन आकडी वाढ झाली आहे. मात्र, कृषी क्षेत्राची वाढ अपेक्षेपेक्षा संथ गतीने होताना दिसत आहे. परंतु, उद्योग क्षेत्राच्या वाढीमुळे ती तूट भरून निघणे अपेक्षित आहे, असे ‘एडीबी’च्या अहवालाने मत व्यक्त केले आहे.