नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादनाचा वेग सरलेल्या जुलै महिन्यात ४.८ टक्क्यांवर घसरला. खाणकाम आणि निर्मिती क्षेत्राची खराब कामगिरी याला कारणीभूत ठरल्याचे गुरूवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून समोर आले. देशातील कारखानदारीतील सक्रियतेचे मापन असलेला औद्योगिक उत्पादन निर्देशांक गुरूवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केला. यानुसार, जुलैमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वाढीचा दर ४.८ टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा दर ६.२ टक्के होता.
हेही वाचा >>> नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन
निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर यंदाच्या जुलैमध्ये ४.६ टक्के राहिला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात तो ५.३ टक्के होता. खाणकाम क्षेत्राचा वाढीचा वेग ३.७ टक्के असून, गेल्या वर्षी जुलैमध्ये तो १०.७ टक्के होता. वीजनिर्मिती क्षेत्राची कामगिरीही गेल्या वर्षीच्या जुलैमधील ८ टक्क्यांवरून, यंदाच्या जुलैमध्ये ७.९ टक्के अशी होती. पायाभूत आणि बांधकाम सामग्री क्षेत्रानेही गेल्या वर्षीच्या १२.६ टक्क्यांच्या वाढदराच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये ४.९ टक्क्यांपर्यंत घसरण दर्शविली आहे. औद्योगिक उत्पादनात एप्रिल ते जुलै या कालावधीत ५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा वाढीचा दर ५.१ टक्के होता.