नवी दिल्ली : स्पर्धात्मक परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या कडाडलेल्या किमतींच्या (चलनवाढ) दबावामुळे कार्यादेशांतील मंद वाढीचा परिणाम म्हणजे सरलेल्या नोव्हेंबरमध्ये देशाच्या उत्पादन क्षेत्राची सक्रियता ही मागील ११ महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी नोंदवण्यात आली, असे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले.
उत्पादन क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ अर्थात पीएमआय ऑक्टोबरमधील ५७.५ गुणांवरून नोव्हेंबरमध्ये ५६.५ गुणांवर घसरला. वाढीचा वेग त्याच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त असला तरी महिनागणिक या क्षेत्राचे आरोग्यमान खालावत असल्याचे अथवा वाढीची मात्रा सौम्य होत असल्याचे ते निदर्शक आहे. या निर्देशांकाच्या परिभाषेत, ५० गुणांवर नोंद ही विस्तारपूरक असते, तर ५० पेक्षा कमी गुण आकुंचन दर्शविते.
हेही वाचा >>> ‘विंडफॉल कर’ अखेर रद्द; पेट्रोल, डिझेल निर्यातीवरील कर, रस्ते व पायाभूत सुविधा उपकरही मागे
आंतरराष्ट्रीय मागणी, नवीन निर्यात कार्यादेशांतील चार महिन्यांच्या उच्चांकामुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या निरंतर वाढीला चालना मिळाली. तथापि, त्याच वेळी किमतीच्या तीव्रतेच्या दबावामुळे देशांतर्गत घटलेले उत्पादन हे या क्षेत्राच्या विस्ताराचा दर मंदावत असल्याचे सुचविणारा आहे, असे एचएसबीसी इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या.
शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर (जीडीपी) ५.४ टक्क्यांच्या म्हणजेच जवळपास दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घरंगळल्याचे स्पष्ट झाले आहे. स्पर्धात्मक परिस्थिती आणि किमतीच्या दबावामुळे उत्पादन क्षेत्राच्या वाढीला नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात मर्यादा पडल्याचे एचएसबीसीच्या सर्वेक्षणानेही अधोरेखित केले आहे.
किंमत-भडक्याचा परिणाम कसा?
भारतीय उत्पादकांनी त्यांच्या वस्तूंच्या विक्री किमतीत ऑक्टोबर २०१३ पासून सर्वाधिक वाढ केली आहे. सर्वेक्षण सहभागी उत्पादन व्यवस्थापकांनी सूचित केले की, मालवाहतूक, कामगारांचे वेतन आणि कच्चा माल व साहित्यावरील अतिरिक्त खर्चाचा भार हा किमती वाढवून ग्राहकांबरोबर वाटून घेतला गेला आहे. उदाहरणार्थ, रसायन, कापूस, चामडे आणि रबर यासह कच्च्या मालाच्या किमती नोव्हेंबरमध्ये वाढल्या, तर त्यापासून उत्पादित वस्तूंच्या किमतीही ११ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत, असे अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी नमूद केले. या परिणामी देशांतर्गत विक्रीवर विपरीत परिणामासह, उत्पादनालाही कात्री लावली आहे.