नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची सक्रियतेचा वेग जुलैमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात मंदावला. उत्पादनात विस्ताराचा दर कमी झाल्याने आणि नवीन कार्यादेशामध्ये घट झाल्याने हा निर्मिती क्षेत्राच्या वेगावर परिणाम झाल्याचे मासिक सर्वेक्षणाच्या मंगळवारी आलेल्या निष्कर्षातून समोर आले.
हेही वाचा >>> दोन हजारांच्या ८८ टक्के नोटा बँकांकडे जमा
एस ॲण्ड पी ग्लोबल इंडियाने निर्मिती उद्योगातील कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाअंती काढलेला पीएमआय निर्देशांक जुलै महिन्यात ५७.७ गुणांकावर नोंदवण्यात आला. मे महिन्यात तो ५८.७ गुणांकावर होता. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये काही प्रमाणात घसरण होऊन तो ५७.८ गुणांकावर आला. त्यानंतर जुलै महिन्यातही त्यात थोडी घसरण झाली आहे.
हेही वाचा >>> हिरोमोटोकॉर्पच्या प्रमुखांवर ईडीचे छापे; निकटवर्तीयाकडे अघोषित परदेशी चलन सापडल्याप्रकरणी कारवाई
गुणांकात घसरण झाली तरीही निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग जून, जुलैमध्ये कायम राहिल्याचे दिसत आहे. मागणीत झालेल्या वाढीमुळे निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग तिसऱ्या तिमाहीच्या सुरूवातीपासून सकारात्मक दिसून आला आहे. जुलै महिन्यात निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक सलग २५ व्या महिन्यात ५० गुणांकावर नोंदविला गेला आहे. हा गुणांक ५० च्या वर असल्यास विस्तारपूरकता आणि त्याखाली असल्यास आकुंचन दर्शवतो.
भारताच्या निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग जुलै महिन्यात काहीसा मंदावल्याचे दिसून आले आहे. नवीन कार्यादेशात वाढ झाल्याने आगामी काळात वाढीचा वेग कायम राहील. याचबरोबर नवीन रोजगार भरतीतही वाढ होईल. – अँड्य्रू हार्कर, अर्थतज्ज्ञ संचालक, एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स