नवी दिल्ली: देशातील निर्मिती क्षेत्राच्या सक्रियतेचा वेग सरलेल्या एप्रिल महिन्यात किंचित मंदावला आहे. मार्च महिन्यात दमदार झेप घेत तो ५९.१ असा १६ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता, त्याउलट तो सरलेल्या महिन्यांत ५८.८ गुणांवर घसरला, असे मासिक सर्वेक्षणाने गुरुवारी स्पष्ट केले.देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविण्यासाठी या क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’च्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांकाचे एप्रिलमधील ५८.८ पातळी ही देशाच्या कारखानदारीची गती महिनागणिक घसरल्याचे द्योतक आहे. निर्देशांक घसरला असला म्हणजेच मार्चच्या तुलनेत विस्तार किंचित कमी झाला असला तरी मागणीच्या मजबूत परिस्थितीमुळे उत्पादनाचा विस्तार सुरूच आहे, असे ‘एचएसबीसी इंडिया’चे अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या.
हेही वाचा >>> अब्जावधींची उलाढाल, पण ‘क्यूएसआर’ क्षेत्रातील मनुष्यबळाला किमान वेतनही नाही!
भारतीय उत्पादकांनी त्यांच्या निर्मित वस्तूंसाठी एप्रिलमध्ये देशांतर्गत आणि बाह्य ग्राहकांकडून जोरदार मागणी मिळवली. वर्ष २०२१ च्या सुरुवातीपासून विस्ताराची ही गती आतापर्यँतची दुसऱ्या क्रमांकाची राहिली आहे. कंपन्यांकडील एकूण नवीन कार्यादेश झपाट्याने वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे. शिवाय, देशांतर्गत बाजार हा वाढीचा मुख्य चालक राहिला असला तरी एप्रिलमध्ये नवीन निर्यात कार्यादेशात लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालाने नमूद केले आहे. भारतीय उत्पादकांनी सध्याच्या पातळीच्या तुलनेत, पुढील वर्षी अधिक उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय, मागणी चांगली राहील या अपेक्षेमुळे एप्रिलमध्ये व्यावसायिक आत्मविश्वास मजबूत झाला आहे. मागणीतील वर्तमान आणि अपेक्षित सुधारणा पूर्ण करण्यासाठी, उत्पादकांनी पहिल्या आर्थिक तिमाहीच्या सुरुवातीला अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले. शिवाय, पुढील वर्षासाठी सकारात्मक दृष्टिकोनामुळे कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची पातळी वाढवण्यास प्रवृत्त केले, असेही भंडारी यांनी नमूद केले. मात्र उत्पादन घटकांच्या वाढत्या किमती आणि मजुरी दर वाढल्याने भारतीय उत्पादकांनी एप्रिलमध्ये त्यांच्या विक्रीच्या किमती वाढवल्या आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची आंशिक भरपाई करून घेतली आहे.