नवी दिल्ली :देशाच्या निर्मिती क्षेत्राने सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात सक्रियता दर्शवत दमदार झेप घेतल्याचे मासिक सर्वेक्षणातून गुरुवारी पुढे आले. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एस अँड पी ग्लोबल इंडिया’द्वारे केलेल्या सर्वेक्षणावर बेतलेला, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा (पीएमआय) निर्देशांक नोव्हेंबरमध्ये ५५.७ अंशांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात तो ५५.३ असा नोंदला गेला होता. सलग सतराव्या महिन्यात ५० गुणांपेक्षा अधिक म्हणजे त्याचा विस्तारदर्शक कल राहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपन्यांनी नवीन कामाच्या प्रमाणात सतत वाढ नोंदविताना, उत्पादनही वाढवत आणले आहे. त्याचबरोबर सरलेल्या महिन्यात सुटे घटक व कच्चा माल यांच्या किमतीही काहीशा नरमल्याने एकंदर कार्यसंचालनाच्या स्थितीत सशक्त सुधारणा दर्शविल्याने निर्मिती क्षेत्राने तीन महिन्यांच्या उच्चांकी झेप घेतली. नवीन मागणी आणि निर्यात स्थितीत सुधारणा निदर्शनास आल्याने आगामी काळ आशादायक आहे, असे निरीक्षण एस अँड पी ग्लोबल मार्केटच्या अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा यांनी नोंदवले.

भारतीय उत्पादकांना ऑक्टोबर २०२३ पर्यंत उत्पादनांत वाढ होण्याची आशा आहे. चांगल्या विक्रीचे अंदाज आणि विपणन प्रयत्न यामुळे आगामी काळ उत्साहवर्धक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. व्यावसायिक आशावाददेखील वाढलेला असून येत्या काळात वस्तू-सेवांना मागणी अधिक राहण्याचा कयास वर्तविला जात आहे. यामुळे कंपन्यांकडून सतत उत्पादित वस्तूंच्या साठय़ात वाढ केली जात आहे. शिवाय विक्री अधिक वाढविण्यासाठी कंपन्यांनी क्षमतावाढीवर भर दिला आहे. त्यापरिणामी रोजगार वाढीच्या आघाडीवर सलग नवव्या महिन्यात सुधारणा झाली आहे, असेही लिमा म्हणाल्या.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s manufacturing sector continues to gain momentum in november zws