नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राला डिसेंबर महिन्यात उतरती कळा लागल्याचे मासिक सर्वेक्षणातून बुधवारी समोर आले. निर्मिती क्षेत्राची सक्रियता सरलेल्या महिन्यात दीड वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरली आहे. महागाईचा पातळी कमी असूनही नवीन कार्यादेश आणि उत्पादनात झालेली सौम्य वाढ यामुळे निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग कमी राहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अदानी समूहाच्या समभागांमध्ये १८ टक्क्यांपर्यंत तेजी

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एस अँड पी ग्लोबल इंडिया’द्वारे केलेल्या सर्वेक्षणावर बेतलेला निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा ‘एचएसबीसी पीएमआय निर्देशांक’ डिसेंबरमध्ये ५४.९ गुणांवर नोंदविण्यात आला. त्याआधीच्या नोव्हेंबर महिन्यात तो ५६ होता. निर्देशांकांने डिसेंबरमध्ये १८ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर असेल तर ते विस्तारदर्शक आणि त्याखाली असेल तर घसरणीचे मानले जाते.

हेही वाचा >>> Stock Market Updates : ‘सेन्सेक्स’मध्ये पाच शतकी घसरण

नवीन व्यवसायातील नफा, पूरक बाजारपेठ स्थिती यामुळे निर्मिती क्षेत्राची वाढ सुरू राहिल्याचे सर्वेक्षणात सहभागी सदस्यांनी स्पष्ट केले आहे. देशातील कंपन्यांनी आशिया, युरोप आणि मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेतून व्यवसायात वाढ नोंदविली आहे. नवीन निर्यात विक्री विस्तारही मध्यम गतीने झाली असून, हा वेग आठ महिन्यांतील सर्वांत कमी आहे. किमतीचा विचार करता कच्च्या मालाच्या किमतीत सुमारे साडेतीन वर्षांतील कमी वाढ नोंदविण्यात आली, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय निर्मिती क्षेत्राची सक्रियता डिसेंबर महिन्यात कायम राहिली आहे. मात्र, वाढीचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. त्याआधीच्या महिन्यात यात वाढ नोंदविण्यात आली होती. उत्पादन आणि नवीन कार्यादेशातील वाढ काही प्रमाणात कमी झाली असली तरी त्यात वाढ दिसून आली आहे.

– प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ (भारत), एचएसबीसी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s manufacturing sector growth hit 18 month low in december print eco news zws