नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राचा वेग सरलेल्या सप्टेंबर महिन्यात मंदावल्याचे मासिक सर्वेक्षणातून मंगळवारी पुढे आले. निर्मिती क्षेत्रातील सक्रियतेला मापणाऱ्या ‘पीएमआय’ निर्देशांकामध्ये घसरण होऊन, तो सप्टेंबर महिन्यात ५६.५ असा आठ महिन्यातील नीचांकी पातळीवर नोंदवला गेला.
देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’द्वारे, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांक सप्टेंबर महिन्यासाठी ५६.५ गुणांवर राहिला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये तो ५७.५ असा नोंदला गेला होता. निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तार आणि ५० गुणांच्या खाली असल्यास त्यात घसरण झाल्याचे मानले जाते.
मुख्यतः कारखाना उत्पादन, विक्री आणि नवीन निर्यात कार्यादेशात घसरण झाल्याने वाढ खुंटली आहे. मार्च महिन्यातील दमदार कामगिरीनंतर सप्टेंबरमध्ये उत्पादन क्षेत्रातील गती मंद झाली. परदेशातून मिळणाऱ्या कार्यादेशात मंद गतीने वाढ झाली आहे. त्या मार्च २०२३ च्या नीचांकी पातळीवर आहेत, असे एचएसबीसी इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मॅसी फर्ग्युसनच्या मालकी विवादावर ‘टॅफे’ला अंतरिम दिलासा
किमतीच्या आघाडीवर, उत्पादन खर्चात आणि विक्री शुल्कात मध्यम वाढ झाली आहे. वाढती खरेदी किंमत, मजुरीवर अधिक खर्च आणि अनुकूल मागणी परिस्थितीचा परिणाम म्हणून, भारतीय उत्पादकांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या शुल्कात किरकोळ वाढ केली. या महिन्यात कच्च्या मालाच्या किमती जलद गतीने वाढल्या, तर त्यातुलनेत उत्पादित वस्तूंच्या किमती वाढलेल्या नाहीत, ज्यामुळे उत्पादन खर्च आणि विक्री किमतीतील अंतर घटले आहे. परिणामी नफा कमी झाल्याने कंपन्यांच्या नोकरभरतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या महिन्यात रोजगार वाढीचा वेग मंदावला आहे. अर्धवेळ आणि तात्पुरत्या कामगारांच्या संख्येत घट झाली आहे, असे भंडारी यांनी नमूद केले.
व्यावसायिक आत्मविश्वासाची एकूण पातळी एप्रिल २०२३ पासून सर्वात कमी नोंदवली गेली आहे. सुमारे २३ टक्के भारतीय उत्पादकांनी पुढील वर्षात उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे, तर उर्वरित कंपन्यांनी कोणताही बदल होणार नाही असे म्हटले आहे.
निर्मिती क्षेत्राचा विस्तार सप्टेंबर महिन्यातही कायम आहे, मात्र वेग घटला आहे. नवीन कार्यादेश आणि उत्पादनातील वाढ काही प्रमाणात कमी झाल्याचा हा परिणाम आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यातील अंतर घटल्याने एकंदर नफाही घटला आहे. – प्रांजुल भंडारी, अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया