नवी दिल्ली : रशियातून सवलतीच्या दरात आयात केलेल्या खनिज तेलामुळे आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील पहिल्या ११ महिन्यांत भारताची ७.९ अब्ज डॉलरची बचत झाली असून, देशाचा आयात खनिज तेल व उत्पादनांचा खर्च १५.२ टक्क्यांनी कमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली घसरण आणि रशियाकडून सवलतीच्या दरात मिळत असलेल्या तेलाचा फायदा भारताला होत आहे. आगामी काळात रशियाकडून सवलत कमी होत असल्याने चालू आर्थिक वर्षात भारताचा खनिज तेल आयातीचा खर्च १०१ ते १०४ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत भारताचा खनिज तेल आयातीचा खर्च १५.२ टक्क्यांनी कमी झाला. या कालावधीत खनिज तेलाची आयात वाढूनही खर्च कमी झाला आहे.

हेही वाचा >>> आधार हाऊसिंग फायनान्सची प्रत्येकी ३०० ते ३१५ रुपयांना भागविक्री

‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, खनिज तेलाच्या आयातीचा खर्च भारताने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ५.१ अब्ज डॉलर आणि २०२३-२४ मध्ये ७.९ अब्ज डॉलरने कमी झाला. गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या अकरा महिन्यांत रशियातून आयात होणाऱ्या खनिज तेलाचे प्रमाण ३६ टक्क्यांवर पोहोचले. हे प्रमाण आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये केवळ २ टक्के होते. याचवेळी पश्चिम आशियातील सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कुवेतमधील खनिज तेलाच्या आयातीचे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत २३ टक्क्यांवर घसरले. हे प्रमाण आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३४ टक्के होते.

खनिज तेलाची आयात घटली

खनिज तेलाची आयात यंदा मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये ८ टक्क्यांनी घटली आहे. सरकारकडून देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासोबत आयातीवर अवलंबित्व कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. खनिज तेलाची एकूण आयात मार्चमध्ये प्रतिदिन ४९ लाख पिंप होती. ती एप्रिलमध्ये प्रतिदिन ४५ लाख पिंपांवर आली आहे, असे व्होर्टेक्सा संस्थेने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s oil import expenditure fell by 15 2 percent in last fiscal year due to oil imports from russia zws