नवी दिल्ली : किरकोळ महागाई दर सरलेल्या मे महिन्यात किंचित घटून ४.७५ टक्क्यांवर म्हणजेच वर्षभरातील नीचांकी पातळीवर रोडावला आहे. खाद्यवस्तूंच्या स्थिरावलेल्या किमती हा दर कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी बुधवारी जाहीर केली. त्यानुसार, एप्रिल महिन्यात ४.८३ टक्के असलेला किरकोळ महागाई दर घसरण होऊन मे महिन्यात तो ४.७५ टक्क्यांवर आला. ही त्याची मे २०२३ नंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. त्यावेळी महागाई दर ४.३१ टक्के पातळीवर होता. खाद्यवस्तूंतील किंमतवाढ मे महिन्यात ८.६९ टक्के नोंदविण्यात आली आहे. एप्रिलमधील ८.७० टक्क्यांच्या तुलनेत ती नाममात्र घसरली असली, तरी एकूण निर्देशांकातील २६ टक्के घटकांमधील किंमतवाढीचा दर ५ टक्क्यांच्या आसपास राहिला, जो जानेवारी २०२० नंतरचा नीचांकी स्तर आहे. तरी खाद्यवस्तूंच्या घटकांतील, विशेषत: भाज्या आणि कडधान्यांसह विशिष्ट खाद्य श्रेणींमधील उच्च चलनवाढ हा चिंतेचा विषय असल्याचे, अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> औद्योगिक उत्पादन दराचा तिमाही तळ

जगभरात सर्वत्रच अन्नधान्यांच्या किमती भडकत असताना, देशात मात्र किरकोळ महागाई दरात यंदा फेब्रुवारी महिन्यापासून निरंतर घसरण सुरू आहे. त्यावेळी ५.१ टक्के असलेला महागाईचा दर एप्रिलमध्ये ४.८ टक्क्यांपर्यंत ओसरत आला आहे.

ग्रामीण महागाईचा दर मेमध्ये ५.२८ टक्के असून, शहरी महागाईचा दर ४.१५ टक्के आहे. भाज्यांची महागाई किंचित कमी होऊन २७.३ टक्क्यांवर आली आहे. त्याआधीच्या एप्रिल महिन्यात ती २७.८ टक्के होती. तृणधान्ये आणि डाळींची महागाई कमी होऊन ८.६९ टक्क्यांवर आली आहे. ती एप्रिलमध्ये १७.४ टक्के होती. इंधन व ऊर्जेची महागाई ३.८३ टक्के नोंदविण्यात आली असून, ती एप्रिलमध्ये ४.२४ टक्के होती.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत

रिझर्व्ह बँकेचा ४.५ टक्क्यांचा अंदाज

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट ४ टक्के निश्चित केले आहे. या महिन्याच्या सुरूवातीला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात किरकोळ महागाईचा दर चालू आर्थिक वर्षात या लक्ष्यापेक्षा जास्त म्हणजे सरासरी ४.५ टक्के राहील असा अंदाज वर्तविण्यात आला. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत हा दर ४.९ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.५ टक्के राहील, असे रिझर्व्ह बँकेचे अनुमान आहे. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण ठरविताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराचा विचार केला जातो.