नवी दिल्ली : देशाच्या सेवा क्षेत्राची सक्रियता सरलेल्या सप्टेंबरमध्ये महिनावार म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत किंचित मंदावली असली तरी तिने दहा महिन्यांतील नीचांकी स्तर गाठला, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, निर्मिती क्षेत्राचा जोमदेखील कमी झाला आहे.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक सप्टेंबर महिन्यात ५७.७ गुणांवर नोंदला गेला. ऑगस्टमध्ये हा गुणांक ६०.९ होता. निर्देशांकाने नोंदवलेली ही नोव्हेंबर २०२३ नंतरची नीचांकी पातळी आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील क्रियाकलापातील वाढीचा वेग मंदावला असला तरी त्याचा दर सकारात्मक आहे. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते.
हेही वाचा >>> ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ला मुद्रांक शुल्कात राज्य सरकारकडून सवलत
नवीन व्यवसायातून नफा, सकारात्मक मागणीचा आणि तंत्रज्ञानामधील गुंतवणुकीने सेवा क्षेत्राचा विस्तार कायम आहे. मात्र कंपन्यांना तीव्र स्पर्धात्मकता, खर्चाचा वाढता दबाव आणि ग्राहकांच्या सततच्या पसंती बदलांमुळे सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग सप्टेंबरमध्ये मंदावला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या अखेर विस्तार झाला असला तरी गती दहा महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आहे. एकंदर सेवा क्षेत्राचा विचार केल्यास, महसूल आणि नवीन कार्यादेशात वाढ सुरू आहे. मात्र परदेशातून मिळणाऱ्या कार्यादेशात घसरण झाली आहे. तरीही, काही कंपन्यांनी आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आखाती देश आणि अमेरिकेतून चांगला महसूल मिळविला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा >>> समभाग विक्रीच्या तुफान माऱ्याने सेन्सेक्स ८२ हजारांखाली
एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या, सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्राचा विस्तार मंद गतीने झाला असून कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये व्यावसायिक क्रियाकलाप ६० गुणांच्या खाली आले आहेत. येत्या काही महिन्यांत सेवा कंपन्यांचा उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यातील अंतर कमी होण्याच्या शक्यतेने नफा आणखी खाली येण्याची शक्यता आहे. कारण उत्पादन खर्चातील महागाई दर तीव्र वेगाने वाढला आहे. मात्र त्या तुलनेत किमतीतील वाढ खूप हळुवार आहे. पुढील वर्षात मागणीची परिस्थिती अनुकूल राहील या अपेक्षेने रोजगाराच्या आघाडीवर मात्र सकारात्मक वातावरण आहे. या सकारात्मक व्यावसायिक दृष्टिकोनामुळे मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत सेवा क्षेत्रातील रोजगारामध्ये वाढ झाली आहे. सेवा प्रदात्यांनी कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या करारासह पूर्णवेळ आणि अर्धवेळ कामगारांच्या भरतीसंबंधाने दिलेल्या अहवालावरून हे स्पष्ट होते.