नवी दिल्लीः देशाच्या तंत्रज्ञान-समर्थ नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांनी यंदा पहिल्या तिमाहीत २.५ अब्ज डॉलरचा निधी उभारणी केली असून, गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ८.७ टक्के वाढ नोंदविण्यात आली. परिणामी नवउद्यमी कंपन्यांसाठी सर्वाधिक निधी उभारणी करणाऱ्या अमेरिका आणि ब्रिटननंतर भारताचा क्रमांक लागला आहे, असे ट्रॅक्शन या मंचाच्या अहवालाने सोमवारी स्पष्ट केले.
ट्रॅक्शनच्या अहवालानुसार, वाहन तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया आणि रिटेल क्षेत्रातील नवउद्यमी कंपन्या पहिल्या तिमाहीत आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या टप्प्यातील नवउद्यमींपेक्षा अखेरच्या टप्प्यातील नवउद्यमी कंपन्यांत गुंतवणुकीत वाढ झालेली आहे. यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत देशातील तंत्रज्ञान नवउद्यमी कंपन्यांनी २.५ अब्ज डॉलरचा निधी उभारला. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात १३.६४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. जगात नवउद्यमी कंपन्यांच्या निधी उभारणीत अमेरिका पहिल्या स्थानी असून, ब्रिटन दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर माल्टा आणि जर्मनी यांचा क्रमांक लागतो.
देशातील पहिल्या टप्प्यातील नवउद्यमी कंपन्यांनी ५२.८ कोटी डॉलरचा निधी उभारला आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ५२ टक्के घट झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात असलेल्या नवउद्यमी कंपन्यांनी १५.७ कोटी डॉलरचा निधी मिळविला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५५ टक्के घसरण झाली आहे. याचवेळी अखेरच्या टप्प्यातील नवउद्यमी कंपन्यांनी सर्वाधिक १८० कोटी डॉलरचा निधी मिळविला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ११४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, असे अहवालाने नमूद केले आहे.
बाजारपेठेत परिपक्वताही
भारतीय नवउद्यमी परिसंस्थेची स्वीकारार्हता वाढत आहे. नवोपक्रम आणि उद्योजकता हा या परिसंस्थेच्या उत्कर्षाचा गाभा आहे, ज्यातून भारतात त्यांचे दीर्घकालीन यश अधोरेखित होते. वाहन तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया आणि रिटेल क्षेत्रातील नवउद्यमी उपक्रम मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करीत आहेत. कंपन्या ताब्यात घेण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून या बाजारपेठेत आलेली परिपक्वताही निदर्शनास येत आहे, असे ‘ट्रॅक्शन’च्या सहसंस्थापिका नेहा सिंग यांनी नमूद केले. जानेवारी-मार्च २०२५ तिमाहीत कोणतीही नवीन ‘युनिकॉर्न’ नवउद्यमींतून पुढे आलेली नसली तरी सहा कंपन्यांनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून सार्वजनिकरित्या निधी उभारणी केल्याचे त्या म्हणाल्या.