पीटीआय, नवी दिल्ली
सलग चौथ्या वर्षी अमेरिका हा भारताचा व्यापारातील सर्वांत मोठा भागीदार ठरला आहे. गेल्या आर्थिक वर्षात या दोन्ही देशांतील व्यापार १३१.८४ अब्ज डॉलरवर पोहोचला. याच काळात भारताच्या चीनसोबतच्या व्यापारी तुटीत वाढ होऊन ती ९९.२ अब्ज डॉलरवर गेली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने व्यापाराची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताची चीनला निर्यात १४.५ टक्क्यांनी कमी होऊन १४.२५ अब्ज डॉलर झाली. त्याआधीच्या वर्षात ही निर्यात १६.६६ अब्ज डॉलर होती. गेल्या आर्थिक वर्षात भारताची चीनमधून आयात ११.५२ टक्क्यांनी वाढून ११३.४५ अब्ज डॉलरवर गेली आहे. त्याआधीच्या वर्षात ही आयात १०१.७३ अब्ज डॉलर होती. भारताची चीनसोबतची व्यापारी तूट १७ टक्क्यांनी वाढून ९९.२ अब्ज डॉलर झाली आहे. त्याआधीच्या वर्षात ती ८५.०७ अब्ज डॉलर होती.
अमेरिकेनंतर चीन हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि चीनमधील द्वीपक्षीय व्यापार १२७.७ अब्ज डॉलरवर पोहोचला. त्याआधीच्या वर्षात हा व्यापार ११८.४ अब्ज डॉलर होता. चीन हा भारताचा २०१३-१४ ते २०१७-१८ पर्यंत आणि २०२०-२१ मध्ये सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश होता. चीनच्या आधी संयुक्त अरब अमिराती हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार होता. आता अमेरिका हा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतासोबतच्या व्यापारात अमेरिकेची व्यापारी तूट गेल्या आर्थिक वर्षात ४१.१८ अब्ज डॉलर आहे. त्याआधीच्या वर्षात ती ३५.३२ अब्ज डॉलर होती. भारत हा अमेरिकेला प्रामुख्याने औषधी द्रव्ये, दूरसंचार उपकरणे, मौल्यवान रत्ने, पेट्रोलियम उत्पादने, सोने आणि इतर मौल्यवान धातूंचे दागिने, तयार कपडे आणि लोह व पोलादाची निर्यात करतो. याचवेळी भारत हा अमेरिकेतून खनिज तेल, पेट्रोलियम उत्पादने, खनिज कोळसा, हिरे, इलेक्ट्रिक यंत्रे, विमाने आणि सोन्याची आयात करतो, असे वाणिज्य मंत्रालयाने नमूद केले आहे.
चीनसोबतची भारताची व्यापारी तूट ९९.२अब्ज या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यातून भारताचे चीनवरील अवलंबित्व समोर आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ई-वाहनांच्या बॅटरी, सोलर सेल आणि उद्योगातील महत्वाचे सुटे भाग यांचा पुरवठा प्रामुख्याने चीनमधून होत आहे. भारतातील आठही प्रमुख उत्पादन श्रेणीत चीन हा आघाडीचा पुरवठादार देश आहे.
अजय श्रीवास्तव, संस्थापक, ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह