भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असे भाकीत मॉर्गन स्टॅन्लेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तविले आहे. जगातील सर्वात जास्त मागणी असलेला ग्राहक बाजार बनेल आणि जागतिक उत्पादनात भारत मोठा वाटा मिळवेल, असा विश्वास मॉर्गन स्टॅन्लेने व्यक्त केला आहे.

वर्ष २०२३ मध्ये ३.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेवरून, २०२६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४.७ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर ती जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तर वर्ष २०२८ मध्ये, भारत जर्मनीला मागे टाकेल. त्यासमयी भारतीय अर्थव्यवस्था ५.७ ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडेल, असा या जागतिक संस्थेचा कयास आहे.

मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, १९९० मध्ये भारत जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती, २००० मध्ये ती १३ व्या स्थानावर घसरली आणि २०२० मध्ये पुन्हा ९ व्या स्थानावर झेपावली. २०२३ मध्ये ती ५ व्या स्थानावर पोहोचली होती. तसेच वर्ष २०२९ मध्ये जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा ३.५ टक्क्यांवरून ४.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

भारताच्या विकासासाठी तीन परिस्थिती मांडण्यात आल्या आहेत. बेअर अर्थात मंदीच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था २०२५ मध्ये ३.६५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरवरून २०३५ पर्यंत ६.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल. सामान्य परिस्थितीमध्ये ती ८.८ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल आणि बुल अर्थात तेजीच्या परिस्थितीमध्ये तिचा आकार १०.३ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल. मंदीच्या परिस्थितीतही दरडोई जीडीपी २०२५ मधील २,५१४ अमेरिकी डॉलरवरून, २०३५ मध्ये ४,२४७ अमेरिकी डॉलर, सामान्य स्थितीत ५,६८३ अमेरिकी डॉलर आणि तेजीच्या परिस्थितीत ६,७०६ अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल.

येत्या काही दशकांत भारताचा जागतिक उत्पादनात वाटा वाढण्याची शक्यता आहे. त्या अंगाने कार्यप्रवण लोकसंख्येत वाढ, लोकशाही व्यवस्था, देशांतर्गत स्थिरता प्रभावित धोरण, चांगल्या पायाभूत सुविधा, वाढता उद्योजक वर्ग आणि सकारात्मक सामाजिक परिणाम अशा विकासाचा समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ असाही की, भारत जगातील सर्वात जास्त मागणी असलेली ग्राहक बाजारपेठ असेल. ३१ मार्च रोजी २०२५ संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात जीडीपी ६.३ टक्के आणि पुढील वर्षी ६.५ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

गुंतवणुकीमध्ये, सार्वजनिक आणि घरगुती भांडवली खर्चामुळे वाढ झाली आहे, तर खासगी कंपन्यांच्या भांडवली विस्ताराच्या खर्चात हळूहळू सुधारणा सुरू झाली आहे. सेवा निर्यातीतील मजबूती कामगार बाजाराच्या दृष्टिकोनासाठी चांगली आहे, तसेच महागाई कमी होण्यासोबतच खरेदी शक्ती सुधारण्याची आशा आहे. अशा प्रकारे, आर्थिक आणि वित्तीय दोन्ही बाजूंनी धोरणात्मक समर्थनामुळे देशांतर्गत मागणी वाढीचा प्रमुख चालक म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे, असे अहवलात म्हटले आहे.

किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. मुख्यतः खाद्यांन्नाच्या किमती कमी झाल्यामुळे हा दिलासा मिळाला असून येत्या काही महिन्यांत महागाई आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये महागाई ४.३ टक्के राहण्याची अपेक्षा असून, जी आर्थिक वर्ष २०२५ मधील सरासरी ४.९ टक्क्यांपेक्षा कमी राहणार आहे.

बाह्य धोके कायम

बाह्य घटकांमुळे विकासाला धोके संभवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकी सरकारच्या व्यापार आणि आयात शुल्क धोरणांचा परिणाम, त्याचबरोबर डॉलरची वाढती ताकद, ‘फेड’कडून थंडावलेली व्याजदर कपातीची प्रक्रिया याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.