रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. याशिवाय आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी दर ६.६ टक्क्यांपर्यंत असू शकतो, असा अंदाज वर्तवत केंद्रीय बँकेने पुन्हा एकदा महागाई हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले आहे. किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांवर आणण्याचे आमचे उद्दिष्ट असले तरी वस्तुस्थिती उलट दिसून येत आहे. २०२३-२४ साठी किरकोळ महागाईचा अंदाज ५.१ टक्क्यांवरून ५.४ टक्के झाला आहे. RBI च्या चलनविषयक धोरणाची (RBI MPC Meet) द्विमासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पहिल्या तिमाहीत जीडीपी ८ टक्क्यांपर्यंत वाढला
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, वास्तविक जीडीपी वाढीचा दर एप्रिल-जून २०२३ तिमाहीत ८ टक्के, दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२३) ६.५ टक्के, तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर २०२३) ६ टक्के आहे. तसेच चौथ्या तिमाहीत (जानेवारी-सप्टेंबर २०२३) ६ टक्के आहे. मार्च २०२४मध्ये तो ५.७ टक्क्यांपर्यंत राहू शकतो. तसेच आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२४) वास्तविक जीडीपी वाढीचा दर ६.६ टक्क्यांपर्यंत असू शकतो.
ग्रामीण मागणीत सुधारणा
आमची अर्थव्यवस्था वाजवी गतीने वाढत आहे आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि जागतिक विकासामध्ये सुमारे १५ टक्के योगदान देत आहे. आरबीआयच्या मते, भारत इतर देशांच्या तुलनेत जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम आहे. देशांतर्गत मागणीची परिस्थिती वाढीला पोषक आहे आणि ग्रामीण भागातही मागणी पुन्हा रुळावर आली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत वेगळीच ताकद – शक्तिकांत दास
जगातील सर्व आघाडीच्या रेटिंग एजन्सी आणि ब्रोकरेज कंपन्यांनी भारताच्या वाढीवर आधीच विश्वास व्यक्त केला आहे. आता आरबीआयनेही आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात विकासाची अफाट क्षमता आहे. जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने उदयास येत आहे. भारतातील कॉर्पोरेट क्षेत्र देखील चांगल्या स्थितीत आहे, विशेष म्हणजे ते अधिक चांगले केले जाऊ शकते. कंपन्यांच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय बँकांनी गेल्या तिमाहीत चमकदार कामगिरी केली आहे.
”परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर वाढता विश्वास”
कोणत्याही अर्थव्यवस्थेवर जेव्हा विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो, तेव्हा त्या देशावर विश्वास निर्माण होतो आणि ही सकारात्मक चिन्हे भारताबरोबर दिसत आहेत. RBI च्या मते भारतात परकीय गुंतवणूक वाढत आहे. याबरोबरच विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वासही भारतावर आहे. भारत बाह्य धोक्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, असंही परकीय चलनाच्या साठ्याबाबत बोलताना आरबीआयने स्पष्ट केले आहे.