नवी दिल्ली : सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताची व्यापार तूट १८.७१ अब्ज डॉलरची पातळी गाठल्याचे शुक्रवारी वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले. त्याआधीच्या म्हणजेच जानेवारी महिन्यात व्यापार तूट १७.४९ अब्ज डॉलर राहिली होती. तर गेल्यावर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापार तूट १६.५७ अब्ज डॉलर नोंदवली गेली होती.
हेही वाचा >>> म्युच्युअल फंडांच्या चाचण्यांचे निकाल ‘ताण’सूचक ! स्मॉलकॅप फंडांच्या गुंतवणूकदारांना परताव्यासाठी विलंबावधी ३० दिवसांपर्यंत
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये व्यापार तूट वाढली असली तरी, निर्यात ११.९ टक्क्यांनी वाढून ४१.४० अब्ज डॉलर या ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे, तर आयात वार्षिक आधारावर १२.२ टक्क्यांनी वाढून ६०.११ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आयातीच्या आकडेवारीनेदेखील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. एकीकडे देशाची निर्यात वाढत असली तरी आयातीत त्यापेक्षा अधिक वाढ होत आहे आणि या दोहोतील तफावत म्हणजे व्यापार तूट महिनागणिक वाढत चालली आहे.
हेही वाचा >>> ‘ई-व्ही’ धोरणाला सरकारची मान्यता; सवलतीसाठी कंपन्यांकडून किमान ५० कोटी डॉलरची गुंतवणूक आवश्यक
सरलेल्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व्यापार तूट २२५.२० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच ११ महिन्यांच्या कालावधीत ती २४५.९४ अब्ज डॉलरवर होती.
वार्षिक निर्यातीत विक्रमी वाढ शक्य
युक्रेन युद्ध, सुएझ कालव्यात वाहतुकीत अडथळे, पाश्चिमात्य देशातील कठोर धोरणे आणि वस्तूंच्या किमती घसरूनही, फेब्रुवारीत भारताची निर्यात समाधानकारक राहिली. सरलेल्या ११ महिन्यांत वस्तू आणि सेवा या दोन्ही प्रकारची निर्यात वाढली आहे. विद्यमान आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच २०२३-२४ मध्ये एकूण निर्यात गेल्या आर्थिक वर्षातील विक्रमी निर्यातीपेक्षा जास्त राहील, अशी आशा केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी व्यक्त केली.