मुंबई : करोना महासाथीनंतर देशात ढेपाळलेली रोजगाराची स्थिती अद्याप सुधारली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये देशात बेरोजगारी दर ८ टक्के नोंदविण्यात आला. ऑक्टोबरच्या ७.७७ टक्क्यांच्या तुलनेत आणखी वाढ झाली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांमधील हा उच्चांक ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकोनॉमी’ने (सीएमआयई) ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार शहरी भागात बेरोजगारी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांमध्ये बेरोजगारीचा दर ८.९६ टक्के, तर ग्रामीण भागात ७.५५ टक्के आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर अनुक्रमे ८.०४ टक्के आणि ७.२१ टक्के होता. राज्यांचा विचार करता हरियाणा (३०.६ टक्के), राजस्थान (२४.५ टक्के), जम्मू-काश्मीर (२३.९ टक्के), बिहार (१७.३ टक्के) आणि त्रिपुरा (१४.५ टक्के) ही सर्वात खराब कामगिरी करणारी राज्ये ठरली आहेत. तर छत्तीसगड (०.१ टक्का), उत्तराखंड (१.२ टक्के), ओदिशा (१.६ टक्के), कर्नाटक (१.८ टक्के) आणि मेघालय (२.१ टक्के) ही सर्वात कमी बेरोजगारी दर असलेली राज्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरमध्ये ६.४३ टक्क्यांपर्यंत खाली आलेल्या बेरोजगारी निर्देशांकात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात दर घटला

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा बेरोजगारी दर नोव्हेंबरमध्ये ३.५ टक्के राहिला. याआधीच्या दोन महिन्यांमध्ये तो अनुक्रमे ४ टक्के आणि ४.२ टक्के होता. तर राज्याच्या शहरी भागांमध्ये बेरोजगारी दर ४.८ टक्के आणि ग्रामीण भागात २.८ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India unemployment rate rises to three month high at 8 percent in november zws