मुंबई : भारतीय प्रवासी विमान कंपन्यांचा निव्वळ तोटा चालू आर्थिक वर्षात कमी होऊन ३ ते ४ हजार कोटी रुपयांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. वाढलेली प्रवासी संख्या आणि तिकिटांच्या दरात झालेली वाढ याला कारणीभूत ठरेल, असे अनुमान ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने सोमवारी वर्तविले.
‘इक्रा’च्या अहवालानुसार, देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक फेब्रुवारी महिन्यात सुमारे १ कोटी २७ लाख होती. प्रॅट अँड व्हिटनी इंजिनच्या समस्येमुळे हवाई वाहतूक क्षेत्रासमोर पुरवठा साखळीचे आव्हान आहे. या इंजिनमधील समस्यांमुळे इंडिगोला ७० हून अधिक विमानांचे उड्डाण थांबवावे लागले आहे. भारतीय प्रवासी विमान कंपन्यांकडील एकूण विमानांपैकी २४ ते २६ टक्के विमानांचे उड्डाण याच अडचणीमुळे ३१ मार्चपर्यंत थांबलेले असेल. प्रॅट अँड व्हिटनी इंजिन जगभरातून परत मागविण्यात आली असली तर विमान उत्पादक कंपन्यांकडून या इंजिनांची चाचणी सुरू आहे. यासाठी सुमारे २५० ते ३०० दिवसांचा कालावधी लागेल.
हेही वाचा >>> रुल्का इलेक्ट्रिकल्सचा व्यवसाय विस्तारासाठी २५ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट
प्रवासी विमान वाहतूक क्षेत्राचा तोट्यातून सावरण्याचा वेग कमी असल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. कंपन्यांचा निव्वळ तोटा चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात ३ ते ४ हजार कोटी रुपयांवर येईल. याचवेळी हवाई प्रवाशांच्या संख्येतील वाढ कायम राहून तिकिटांचे दरही वाढतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इंडिगोमधील ५.८३ टक्के भागभांडवलाची गंगवाल यांच्याकडून विक्री
नवी दिल्ली: प्रवासी विमान सेवेतील देशातील सर्वात मोठी कंपनी ‘इंडिगो’चे सह-संस्थापक आणि प्रवर्तक राकेश गंगवाल यांनी सोमवारी कंपनीतील ५.८३ टक्के हिस्सा खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे विकला आणि ६,७८५ कोटी रुपयांचा मोबदला मिळवला. सह-संस्थापक राहुल भाटिया यांच्याशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर कंपनीतील हिस्सेदारी कमी करण्याच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर केलेल्या निर्णयानुसार ही भागविक्री करण्यात आल्याचे समजते. इंटरग्लोब एव्हिएशन ही भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनी देशांतर्गत हवाई बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक हिस्सा राखणाऱ्या ‘इंडिगो’ची पालक कंपनी आहे. मुंबई शेअर बाजाराकडे उपलब्ध आकडेवारीनुसार प्रवर्तक गटाची कंपनीत ६३.१३ टक्के हिस्सा होता, ज्यात भाटिया आणि इंटरग्लोब एंटरप्रायझेस यांची एकत्रित ३७.९२ टक्के हिस्सेदारी आहे.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 11 March 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात स्वस्त की महाग, जाणून घ्या…
तर फेब्रुवारी २०२२ पासून, गंगवाल आणि त्यांची पत्नी शोभा गंगवाल कंपनीच्या समभागांची विक्री करत आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये, दोहोंनी २.७४ टक्के भागभांडवल २,००५ कोटी रुपयांना विकले. तर ऑगस्ट २०२३ मध्ये, शोभा गंगवाल यांनी कंपनीतील २.९ टक्के भागभांडवल सुमारे २,८०० कोटी रुपयांना, तर त्याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये ४ टक्के हिस्सा २,९४४ कोटी रुपयांना विकला आहे.