टाटा यांनी भारताला जगासमोर नेले आणि जगातील सर्वोत्तम गोष्टी भारतात आणल्या. त्यांनी टाटा उद्योग समूहाचे संस्थात्मकीकरण केले आणि त्याला वैश्विक लौकिक मिळवून दिला. १९९१ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून टाटा समूहाने साधलेली ७० पटीने वाढ हा त्यांच्या असामान्य नेतृत्वगुणाचा प्रत्यय आहे. – मुकेश अंबानी, अध्यक्ष रिलायन्स इंडस्ट्रीज

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रतन टाटा हे एक निष्णात उद्योगधुरीण होतेच, तर त्यांनी सचोटी, सहृदयता आणि व्यापक हितासाठी निःसंदिग्ध कटिबद्धतेला मूर्तरूप दिले. त्यांच्यासारख्या दिग्गजाचे मावळणे कधीही शक्यच नाही. –गौतम अदानी, अध्यक्ष अदानी समूह

भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेपेच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि आपण या स्थितीला पोहचण्यामागे टाटा यांचे जीवन आणि कार्यकर्तृत्वाचे खूप मोठे योगदान आहे. – आनंद महिंद्र, अध्यक्ष, महिंद्र ॲण्ड महिंद्र समूह

हेही वाचा : टाटा न्यासाचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटांचे नाव चर्चेत

टाटा यांनी देशाला कायम व्यावसायिक हितसंबंधांच्या पुढे ठेवले. त्यांची दृष्टी देशासाठी आणि देशातील असंख्य लोकांच्या जीवनाला प्रेरणा देणारी आणि परिवर्तनकारी होती. – वेणू श्रीनिवासन, मानद अध्यक्ष टीव्हीएस मोटर

भारतीय उद्योग क्षेत्रालावर टाटांनी, परोपकार आणि आपण ज्या जगात राहतो त्या जगाला अधिक चांगले बनवण्याचा अथक उत्साह प्रदान करणारी अमीट छाप सोडली आहे. – सुनील भारती मित्तल, अध्यक्ष भारती एंटरप्रायझेस

भारतातील आधुनिक व्यवसायांच्या नेतृत्वाला मार्गदर्शन आणि त्याच्या विकसनात टाटा यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. भारताला अधिक चांगले बनवण्याची त्यांची मनापासून काळजी होती. – सुंदर पिचई, मुख्य कार्यकारी अधिकारी, गूगल

अंगभूत सौजन्य, नम्रता, निगर्वी स्वभाव

रतन टाटा यांना मी कैक वेळा भेटलो आहे. त्यांचे अंगभूत सौजन्य, नम्रता आणि निगर्वी स्वभावाने मी नेहमीच भारावून गेलो. ते नेतृत्वासाठी ते कायम पुढाकार घ्यायचे, काही वर्षांपूर्वी आम्ही दक्षिण आफ्रिकेत एकत्र होतो तेव्हा हे जाणवले. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असलेल्या भारतीय उद्योग जगताचे त्यांनी उत्कृष्ट प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह अनेक पटींनी वाढला आणि एक जागतिक शक्ती बनला. त्यांनी ज्या प्रकारे विविध कंपन्या एका समूहात आणल्या, ते व्यवस्थापनशास्त्राच्या संस्थांनी अभ्यासण्यासारखे आहे. काही वर्षांपूर्वी किर्लोस्कर ब्रदर्सच्या शताब्दी समारंभाच्या उद्घाटन समारंभासाठी त्यांना आमंत्रित करण्यासाठी मी आणि माझी मुलगी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. टाटा हे आमचे पहिले पतपुरवठादार होते, हे मी त्यांना दाखवू शकलो. त्यांनी आमचे खूप प्रेमाने स्वागत करून आम्हाला तारीख दिली. मात्र, त्या दिवशी रविवार असल्याचे त्यांना काही वेळात लक्षात आले. सुट्टीचा दिवस असूनही नक्की येण्याचे त्यांनी आश्वासन दिले आणि ते आलेही. – संजय किर्लोस्कर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, किर्लोस्कर ब्रदर्स

हेही वाचा : रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

भारतीय व्यवसायांच्या वैश्विक विस्तारातील दीपस्तंभ

उद्योग क्षेत्रातील दूरदृष्टी असणारे रतन टाटा हे दिग्गज आणि असामान्य नेतृत्व होते. त्यांनी देशाला आकार देण्यात योगदान दिले. गेली तीन दशके आमचा परियच होता. अतिशय चांगले व्यक्तिगत तसेच व्यावसायिक संबंध आमच्यात होते. अतिशय कार्यक्षम आणि नीतीमूल्ये जपणारे रतन टाटा मला नेहमीच मित्र म्हणून सतत उपलब्ध असायचे. मला मार्गदर्शन करण्यासोबत व्यावसायिक सल्लाही ते वेळोवेळी देत. रतन टाटा हे नेहमी भारताचे हित सर्वोच्च मानायचे आणि त्यातूनच त्यांनी भारत हा ‘ब्रॅण्ड‘ सकारात्मक आणि भक्कमरित्या जगभरात पोहोचविला. २००० च्या सुरूवातीला भारतीय व्यवसायांच्या जागतिक वाटचालीत टाटा हे दीपस्तंभासारखे होते. त्यांच्यातील नेतृत्वगुणाची खरी कसोटी २६/११ च्या हल्ल्यावेळी दिसून आली. ते आणि त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे ताजमहल पॅलेस हॉटेलपुढे उभे होते. त्यांच्या जाण्याने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक उद्योगविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. – बाबा कल्याणी (अध्यक्ष, कल्याणी समूह)

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian business tycoons and entrepreneur pays tribute to ratan tata print eco news css