मुंबई : देशातील भांडवली बाजार पुढील पाच वर्षांत दुपटीने वाढेल आणि त्यानंतरच्या दशकात तो चारपटीने वाढेल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सहसंस्थापक रामदेव अगरवाल यांनी मंगळवारी वर्तविला. भारत सध्या एका नव्या टप्प्यावर आहे. भारतीय कंपन्यांचे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागले आहेत. कंपन्यांच्या उत्पन्नात एकूण ३२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. आधी ही वाढ २६ टक्क्यांपर्यंत होईल, असा अंदाज होता. एकंदर भारतीयांचा बाजाराकडे ओढा, डिमॅट खात्यांच्या संख्येत वाढ आणि पुढील २५ वर्षांत भारताचा बचत दर १०० ते १५० लाख कोटी डॉलरवर जाईल. त्यामुळे बचतीच्या या सुनामीवर बाजार मोठी झेप घेईल. देशात दरमहा ३ कोटी डिमॅट खात्यांची भर पडत आहे, असे अगरवाल यांनी नमूद केले.
हेही वाचा >>> मोठी बातमी! ८१.५ कोटी भारतीयांचा आधार अन् पासपोर्ट संबंधित डेटा लीक
कंपन्यांच्या कमाईकडे लक्ष
प्रत्येक भांडवली बाजारासमोर आव्हाने असतात. जागतिक पातळीवरील आव्हाने गुंतवणूकदारांच्या नियंत्रणाबाहेरील असतात. त्यामुळे आपण कंपन्यांच्या उत्पन्नाकडे ९० टक्के पाहतो आणि जागतिक घडामोडींकडे १० टक्के पाहतो. त्यामुळे कोणती कंपनी नफा मिळवते आणि तिचा पुढील आर्थिक अंदाज काय आहे, याकडे माझे लक्ष असते, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले.