मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांचा आशावाद आणि देशावरील त्यांच्या वाढत्या विश्वासामुळे भारतीय भांडवली बाजाराचे मूल्यांकन वाढले आहे, असे मत सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी मंगळवारी व्यक्त केले. भांडवली बाजाराचे किंमत-उत्पन्न गुणोत्तर अर्थात पीई रेशो हे २२.२ वर पोहोचले असून ते जगभरातील अनेक भांडवली बाजाराच्या निर्देशांकांच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.
काही लोकांच्या मते भांडवली बाजारातील कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन वाढले असून बाजार महाग झाला आहे. मत तरीही गुंतवणूक का येत आहे? कारण परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय भांडवली बाजारावर असलेल्या विश्वासाचे ते प्रतिबिंब आहे, असे बूच भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी बूच यांनी स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांच्या उच्च मूल्यांकनाबाबत चिंता व्यक्त केली होती. शिवाय ते कधीही फसव्या बुडबुड्यांमध्ये रूपांतरित होऊ शकते, असा इशाराही दिला होता. त्यानंतर बहुतांश स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळालेल्या वेगामुळे परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचा आशावाद वाढला आहे. महिनागणिक वस्तू सेवा कर संकलनात (जीएसटी) होणारी वाढ, आगाऊ कर भरणा, वीज आणि ऊर्जेचा वापर यावरून अर्थव्यवस्थेची ताकद दर्शविणारी आकडेवारी पाहून त्यांना प्रोत्साहन मिळते, असे त्या म्हणाल्या.
शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अखेरीस ३७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे दशकभरापूर्वी ७४ लाख कोटी रुपये होते. बाजार भांडवल आता एकूण देशांतर्गत सकल उत्पादनाच्या (जीडीपी) पातळीवर आहे. भारतीय संस्थांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भांडवली बाजारात समभाग आणि रोख्यांच्या माध्यमातून एकूण १०.५ लाख कोटी रुपये बाजारातून उभे केले, ज्यामध्ये रोख्यांच्या माध्यमातून उभारल्या गेलेल्या ८ लाख कोटी रुपयांचा समावेश आहे.