वृत्तसंस्था, मुंबई : भारतीय कंपन्यांना गुजरातमधील गिफ्ट आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) आणि परदेशी निर्देशांकात थेट सूचिबद्ध होता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी दिली.
सीतारामन यांच्या हस्ते कॉर्पोरेट डेब्ट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट फंड (सीडीएमडीएफ) सादर करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भारतीय कंपन्यांना परदेशी निर्देशांकात थेट सूचिबद्ध होता येईल. याचबरोबर सूचिबद्ध नसलेल्या भारतीय कंपन्यांना गिफ्ट आयएफएससीतील निर्देशांकांमध्ये थेट सूचिबद्ध होता येणार आहे. याला सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. आयएफएससी निर्देशांकांमध्ये सूचिबद्ध आणि सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांना थेट सूचिबद्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
जागतिक भांडवलाचा पुरवठा भारतीय कंपन्यांना व्हावा आणि त्यांचे बाजारमूल्य वाढावे, यासाठी हे पाऊल अतिशय महत्वाचे ठरणार आहे. गिफ्ट आयएफससीच्या माध्यमातून पारंपरिक वित्तीय सेवांच्या पलिकडे जाण्याचा उद्देश पूर्णत्वास येत आहे. सरकारने मे २०२० मध्ये पहिल्यांदा भारतीय कंपन्यांना परदेशी ठिकाणी थेट सूचिबद्ध करण्याची कल्पना मांडली. आयएफएससी हे परदेशी ठिकाण नसले तरी ते विशेष आर्थिक क्षेत्र आहे. त्याठिकाणी मिळणाऱ्या फायदे आणि प्रोत्सानहपर सवलती परदेशी ठिकाणांप्रमाणे आहेत, असे सीतारामन यांनी नमूद केले.