नवी दिल्ली : करोना साथीच्या परिणामाने ओढवलेल्या आर्थिक अडचणींचा सुरू राहिलेला पाठलाग, त्याचप्रमाणे वस्तू व सेवांच्या मागणीला अपेक्षित बहर नसल्याने येत्या मार्चअखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांत विकासगती मंदावण्याचा केंद्र सरकारचा अंदाज आहे. वर्षभरापूर्वी गाठलेल्या ८.७ टक्क्यांच्या तुलनेत, चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर ७ टक्क्यांवर सीमित राहण्याचा अंदाज शुक्रवारी वर्तवण्यात आला. अर्थात रिझव्र्ह बँकेकडून व्यक्त करण्यात ६.८ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत तो वरचढ आहे.
केंद्रीय राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाने व्यक्त केलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, २०२२-२३ मध्ये देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) वाढीचा दर ७ टक्के राहील. विशेषत: खाणकाम आणि निर्मिती क्षेत्राची कामगिरी डळमळल्याचा हा परिणाम सांगण्यात आला आहे. २०२१-२२ मध्ये ९.९ टक्क्यांनी वाढलेले निर्मिती क्षेत्राचे एकूण उत्पादन चालू आर्थिक वर्षांत १.६ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे खाणकाम क्षेत्रातील उत्पादन वाढही वर्षभरापूर्वीच्या ११.५ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांवर गडगडण्याचे अनुमान आहे. बांधकाम क्षेत्राची ११.५ टक्क्यांवरून ९.१ टक्क्यांपर्यंत, तसेच सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवांची गतीही १२.६ टक्क्यांवरून ७.९ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर करतील, त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत अग्रिम अंदाज व्यक्त केला आहे. स्थिर (२०११-१२ सालच्या) किमतींवर आधारित वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन विद्यमान २०२२-२३ मध्ये १५७.६० लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. ३१ मे २०२२ रोजी घोषित तात्पुरत्या अंदाजाप्रमाणे, आधीच्या २०२१-२२ आर्थिक वर्षांमध्ये वास्तविक जीडीपी १४७.३६ लाख कोटी रुपये होता, असे सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नामित विकास दर (नॉमिनल जीडीपी) म्हणजेच चलनवाढीच्या समायोजनाशिवाय असलेला विकास दर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १५.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कृषी आणि सेवा क्षेत्राचा हातभार
सांख्यिकी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, कृषी क्षेत्र मागील वर्षांतील ३ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ३.५ टक्क्यांचा विस्तार दर्शवेल. त्याचप्रमाणे प्रसारण विभागाशी संबंधित सेवा, व्यापार, आतिथ्य, वाहतूक आणि दळणवळण सेवा २०२१-२२ मधील ११.१ टक्क्यांच्या वाढीवरून, चालू आर्थिक वर्षांअखेर १३.७ टक्क्यांची वाढ दर्शवतील. वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि व्यवसायजन्य सेवा विभागही मागील वर्षांतील ४.२ टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्षांत ६.४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.