पीटीआय, नवी दिल्ली
डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची तेजीने घोडदौड सुरू आहे. सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून ती उदयास आली असून, जागतिक विकासात तिचे १६ टक्क्यांहून अधिक योगदान राहण्याचा अंदाज आहे, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) सोमवारी विश्वास व्यक्त केला.
भारताचा विकास अतिशय मजबूत दराने सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने निरीक्षण नोंदवले असून, सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या मोठ्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे, असे आयएमएफचे नदा चौईरी यांनी सांगितले. जागतिक पातळीवर अनेक अडसर असूनदेखील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि विकासासाठी भक्कम आधारासाठी आवश्यक असलेली लॉजिस्टिक व्यवस्था विकसित करण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारताची लोकसंख्या खूप मोठी असून त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. परिणामी संरचनात्मक सुधारणांद्वारे या संभाव्यतेचा उपयोग केल्यास मजबूत दराने वाढ होण्याची क्षमता आहे.
हेही वाचा >>>हरित ‘ई-बस’ची संख्या वर्षभरात दुपटीने वाढणार! सरकारी मंडळांकडून मोठी मागणी, खरेदी किंमतीही घटण्याचा अंदाज
विद्यमान सरकारने अनेक संरचनात्मक सुधारणा केल्या असून त्यातील प्रमुख एक म्हणजे डिजिटलायझेशन आहे. धोरणाच्या माध्यमातून प्राधान्याने वित्तीय तूट काढणे, किंमत स्थिरता सुरक्षित करणे, आर्थिक स्थिरता राखणे आणि कर्जाची स्थिरता जपून संरचनात्मक सुधारणांद्वारे सर्वसमावेशक वाढीचा वेग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आयएमएफने आपल्या वार्षिक अहवालात शिफारस केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने करोना महासाथीपासून जोरदार उभारी घेतली आहे. परिणामी जागतिक वाढीची ती एक महत्त्वाची चालक शक्ती बनली आहे, असेही आयएमएफने नमूद केले.