Trump Reciprocal Tariffs: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ (आयात शुल्क) आकारण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत आणि इतर देशांनी अमेरिकेवर लादलेल्या टॅरिफवर टीका करत, २ एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. इतर देश अमेरिकेवर जितके टॅरिफ आकारतात तितकेच टॅरिफ अमेरिकाही इतर देशांवर आकारणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे हिरे आणि दागिन्यांपासून ते औषध आणि ऑटोमोबाईल्सपर्यंत, अब्जावधींच्या निर्यातीला अमेरिका जास्त शुल्क आकारण्याचा धोका आहे, ज्यामुळे व्यवसाय, नोकऱ्या आणि आर्थिक विकास धोक्यात येण्याच शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात ट्रम्प म्हणाले की, इतर देशांनी वर्षानुवर्षे अमेरिकेवर अति आयात शुल्क आकारले आहे आणि आता याला उत्तर देण्याची वेळ आली आहे. यावेळी त्यांनी विशेषतः भारताचा उल्लेख करून म्हटले की, भारत अमेरिकेतून होणाऱ्या वाहन आयातीवर १००% पेक्षा जास्त आताय शुल्क लादतो. ट्रम्प यांनी अधोरेखित केले की, परस्पर शुल्काची नवीन प्रणाली अमेरिकेसाठी व्यापार सुयोग्य बनवण्याच्या उद्देशाने आहे.
कॅनडा, मेक्सिको आणि चीनसारख्या देशांना यापूर्वीच अमेरिकेच्या परस्पर आयात शुल्काचा सामना करावा लागला आहे. आता २ एप्रिलपासून भारतासह सर्व देशांना अमेरिका नवीन आयात शुल्क आकारणार आहे.
भारताला मोठा फटका
अनेक आर्थिक तज्ञांना असे वाटते की, भारताला अमेरिकेच्या या नवीन आयात शुल्कांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या मते, भारत आणि अमेरिका ऐकमेकांवर आकारणाऱ्या आयात शुल्कांत मोठा फरक आहे. भारत अनेक उत्पादनांवर अमेरिकेपेक्षा जास्त आयात शुल्क आकारतो.
ड्यूश बँकेच्या विश्लेषकांनी असे नमूद केले की, अमेरिकन वस्तूंवरील भारताचे सरासरी आयात शुल्क, भारतीय उत्पादनांवर अमेरिका लादत असलेल्या शुल्कापेक्षा १० टक्क्यांहून अधिक जास्त आहे. जर अमेरिकेने समान शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला तर भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
मॉर्गन स्टॅन्लेच्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की, जर अमेरिकेने जर समान आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला तर भारत आणि थायलंड यांच्यावर अमेरिका आकारत असलेल्या आयात शुल्कांत ४ ते ६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
दरवर्षी ७०० कोटींची संभाव्य नुकसान
ट्रम्प यांनी नवीन आयात शुल्कांची घोषणा केल्यामुळे ऑटोमोबाईल्स, रसायने आणि दागिने यासारख्या क्षेत्रातील भारतीय निर्यातदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सिटी रिसर्चच्या अहवालानुसार या शुल्कांमुळे भारताला दरवर्षी सुमारे ७ अब्ज डॉलर्सचे (७०० कोटी रुपये) नुकसान होऊ शकते. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे रसायने, धातू उत्पादने आणि दागिने या उद्योगांना सर्वाधिक फटका बसेल, त्यानंतर ऑटोमोबाईल्स, औषधनिर्माण आणि अन्न उत्पादने यांचा क्रमांक लागतो. २०२४ मध्ये भारताने अमेरिकेत एकूण सुमारे ७४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती.