नवी दिल्ली : सरलेल्या एप्रिल महिन्यात भारतातून वस्तू निर्यात १ टक्क्याने वाढून ३४.९९ अब्ज डॉलरवर पोहोचूनही, देशाच्या आयात-निर्यातीतील तफावत अर्थात व्यापार तुटीने १९.१ अब्ज डॉलरची पातळी गाठल्याचे बुधवारी वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले. तुटीची ही चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. एप्रिल २०२३ मध्ये व्यापार तुटीचे प्रमाण १४.४४ अब्ज डॉलर होते.
हेही वाचा >>> ‘वॉलमार्ट’मध्ये नोकरकपातीचे वारे
विद्युत उपकरणे, रसायने, खनिज तेल उत्पादने आणि औषधनिर्माण यांसारख्या क्षेत्रातील व्यापारात वाढीमुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली गेली. मात्र एकीकडे देशाची निर्यात वाढत असली तरी आयातीत त्यापेक्षा अधिक वाढ होत आहे आणि या दोहोंतील तफावत म्हणजे व्यापार तूट महिनागणिक वाढत चालली आहे. सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे एकूण आयात एप्रिल २०२३ मधील ४९.०६ अब्ज डॉलरवरून १०.२५ टक्क्यांनी वाढून ५४.०९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
हेही वाचा >>> किमान सार्वजनिक भागधारणा वाढवण्यासाठी ‘एलआयसी’ला मुदतवाढ
सोने आणि खनिज तेलाच्या आयातीवर वाढलेल्या खर्चामुळे व्यापार तूट सरलेल्या महिन्यात चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये सोन्याची आयात दुपटीने वाढून ३.११ अब्ज डॉलरवर, तर खनिज तेलाची आयात २०.२२ टक्क्यांनी वाढून १६.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सरलेल्या आथिर्क वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या एकूण वस्तू आणि सेवा निर्यातीने ७७८.२१ अब्ज डॉलरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. गेल्या आर्थिक वर्षात वस्तू निर्यात ४३७.१ अब्ज डॉलर तर सेवा निर्यात ३४१.१ अब्ज डॉलर होती. वस्तूंच्या निर्यातीत, ३० प्रमुख क्षेत्रांपैकी १३ क्षेत्रांनी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिलमध्ये सकारात्मक वाढ दर्शविली. यामध्ये कॉफी, तंबाखू, मसाले, प्लास्टिक आणि हस्तकला उत्पादनांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिली.