पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, ५ एप्रिल रोजी समाप्त आठवड्याच्या अवधीत गंगाजळी २.९८ अब्ज डॉलरने वाढून ६४८.५६ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. याआधीच्या आठवड्यात परकीय चलन गंगाजळी ६४५.५८ अब्ज डॉलर पातळीवर होती. सध्या भांडवली बाजारातील विक्रमी तेजी आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू राहिलेला डॉलर-पौंडाचा लक्षणीय ओघ पाहता, गंगाजळीने पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे.रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सुवर्ण साठ्याचे मूल्य सध्या ५४.५५ अब्ज डॉलर आहे.
हेही वाचा >>>व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
ऑक्टोबर २०२१ मध्ये, देशाच्या परकीय चलन गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठली होती. तर भांडवली बाजारातील अस्थिरता, रुपयातील घसरण, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास युद्ध आणि खनिज तेलाच्या दरातील मोठे चढ-उतार आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यांसारख्या प्रतिकूल घटनांमुळे त्यात उच्चांकी पातळीपासून घसरण झाली होती.
परकीय गंगाजळी म्हणजे काय?
देशाला विविध मार्गांनी कमी-अधिक प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत असते. त्याच्या संचयाला परकीय गंगाजळी असे संबोधले जाते. रिझर्व्ह बँकेकडे परकीय गंगाजळी मुख्यतः अमेरिकी डॉलर, युरो, पौंड स्वरूपात साठवली जाते. परंतु हा संचय तसाच न ठेवता अमेरिका आणि इतर देशांनी जारी केलेल्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतविला जातो. जेणेकरून त्यावर व्याज स्वरूपात उत्पन्न मिळते. मात्र उत्पन्न मिळविणे हा मुख्य उद्देश नसून परकीय गंगाजळी देशाच्या अर्थव्यवस्थेत आपत्कालीन स्थितीत संरक्षक कवच म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असते.