Changing Consumer Pattern in India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आणि प्राप्तिकरातील नव्या तरतुदींची देशभर चर्चा होऊ लागली. याच प्रभावाखाली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मध्यमवर्ग आपकडून भाजपाकडे सरकल्याचं निरीक्षणही राजकीय विश्लेषकांनी मांडलं. त्यामुळे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यामुळे नेमका कुणाला फायदा झाला आणि कुणाला तोटा? याची चर्चा राजकीय वर्तुळापासून ते सामान्यांच्या घरातल्या दिवाणखान्यापर्यंत चालू आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे बाजारपेठेत मात्र यामुळे ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीत काही बदल दिसू लागले आहेत!
जेवढं अधिक उत्पन्न करमुक्त, तेवढा अधिक ‘न भरावा लागलेला कर’ लोकांच्या हाती उरणार याचा सोपा अर्थ हा, की आता जास्त लोकांच्या हातात जास्तीचा पैसा उरणार, जो एकतर गुंतवला जाऊ शकतो किंवा मग खर्च होऊ शकतो. सध्या शेअर बाजारातील रोजच्या पडझडीमुळे गुंतवणुकीच्या पद्धतीतले बदल समोर येण्यासाठी काही काळ जावा लागेल. पण खरेदीचा बदलणारा पॅटर्न बाजारातील उत्पादक कंपन्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नाही. यातल्या काही कंपन्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना यासंदर्भातली त्यांची काही निरीक्षणं मांडली आहेत.
कशावर कमी, तर कशावर जास्त खर्च?
गेल्या काही महिन्यांपासून एकूणच नागरी भागातील खरेदीचं प्रमाण कमी होऊ लागल्याचं निरीक्षण मांडलं जात होतं. अर्थात, ग्राहक बाजारात एकतर कमी जात होता किंवा गेला तरी त्यातले किती ग्राहक प्रत्यक्ष खरेदीदार होत होते, यावर शंका होती. गेल्या काही दिवसांमध्ये हाच कल कायम असला, तरी कोणत्या गोष्टी कशा स्वरूपात खरेदी केल्या जात आहेत, यात मात्र बदल होत असल्याचं दिसत आहे. रोजच्या घरगुती वस्तूंचे आकार कमी होऊ लागले आहेत, अर्थात ग्राहक या वस्तू कमी आकाराच्या घेणं जास्त पसंत करत आहेत. तर दुसरीकडे चैनीच्या किंवा महागड्या वस्तूंवर ईएमआयच्या मदतीने अधिक खर्च करत असल्याचं निरीक्षण आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदीबरोबरच आरबीआयनं गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच घटवलेले व्याजदर लोकांना स्वस्तात कर्जे मिळवून देणारी ठरतील, असं मानलं जात आहे. त्यामुळे त्याचाही या खरेदीच्या पॅटर्नवर परिणाम होण्याची शक्यता आहे. “सध्या बाजारात होणाऱ्या महागड्या वस्तूंच्या खरेदीपैकी जवळपास ७५ टक्के व्यवहार हे इएमआयच्या आधारे होत आहेत”, असं निरीक्षण विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता यांनी नमूद केलं. पाच वर्षांपूर्वी हेच प्रमाण ५५ ते ६० टक्के होतं!
स्वस्त EMI चा फायदा
या परिस्थितीला स्वस्त व सहज उपलब्ध होणारी इएमआयची सुविधा कारणीभूत ठरल्याचं पॅनासोनिक लाईफ सोल्युशन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक फुमुयासू फुजीमोरी यांनी नमूद केलं आहे. आपल्या कंपनीची इएमआय सुविधा वापरून ग्राहक इन्व्हर्टर, एसी, वॉशिंग मशीन अशा वस्तू खरेदी करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं आहे. “लोकांच्या हातात अजूनही इतका पैसा उरत नाही ज्यातून ते मोठ्या उत्पादनांची किंमत एकाच वेळी चुकवू शकतील. त्यामुळे इएमआयचे पर्याय अशाच प्रकारे अधिकाधिक ग्राहकांकडून स्वीकारले जातील”, असं निरीक्षण ईवाय-पार्थेननचे व्यवसाय भागीदार अंशुमन भट्टाचार्य यांनी नोंदवलं आहे.
छोट्या उत्पादनांच्या बाजारपेठेत काय घडतंय?
पर्सनल केअर, स्नॅक्स, साबण अशा रोजच्या घरगुती छोट्या उत्पादनांच्या बाजारपेठेत वेगळं चित्र आहे. ग्राहक या वस्तूंची छोट्या आकाराची उत्पादने खरेदी करत आहेत. यामुळे महिन्याचं आर्थिक गणित चोख ठेवण्यासाठी त्यांच्याहाती जास्त रक्कम शिल्लक राहते. सामान्यपणे मध्यमवर्गामध्ये हा कल दिसतो, असं सिप्ला हेल्थचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक शिवम परी यांनी नमूद केलं.