पीटीआय, नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १२ हजार ९६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती वर्षभर नरमलेल्या असताना, देशांतर्गत इंधनाच्या किमतीही गोठवल्या गेल्याने कंपनीने वार्षिक नफ्यापेक्षा जास्त नफा या एका तिमाहीत नोंदविला आहे. या उत्तम कामगिरीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने अपेक्षेपेक्षा सरस म्हणजे प्रति समभाग ५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
कंपनीला मागील आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत २७२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तेल शुद्धीकरण आणि विपणन नफा यात वाढ झाल्याने कंपनीने चांगले आर्थिक निकाल नोंदविले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे विक्री दर स्थिर ठेवूनही कंपनीने चांगला नफा कमावला आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरले होते. त्या वेळी कंपनीने पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त ठेवले होते. त्यामुळे कंपनीला तोटा भरून काढता आला. पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतून कंपनीचे करपूर्व उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत १७ हजार ७५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते केवळ १०४ कोटी रुपये होते.
हेही वाचा… वित्तीय तूट ७.२ लाख कोटींवर, सप्टेंबरअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या ३९.३ टक्क्यांवर
तेल कंपन्यांकडून दरवाढीला स्थगिती
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले. तरीही सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वर्षाहून अधिक काळ लोटला तरी वाढ केलेली नाही. त्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्यांचा समावेश आहे.