मुंबई : अमेरिकी डॉलर पुढे रुपयाने शुक्रवारच्या सत्रात ३५ पैशांची गटांगळी घेत ८३.४८ रुपयांची ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. जागतिक पातळीवर इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत प्रबळ होणारा डॉलर, देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण, परदेशी निधीचे भांडवली बाजारातून निर्गमन आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती याच्या एकंदर परिणामी रुपयाने डॉलरपुढे नांगी टाकली.
हेही वाचा >>> किआ’ची वाहने १ एप्रिलपासून महागणार
शुक्रवारी आंतरबँक चलन व्यवहारात, रुपयाने ८३.२८ या नीचांकापासूनच व्यवहारास सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात रुपयातील घसरण अधिक वाढल्याने रुपयाने ८३.४८ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. गुरुवारच्या सत्रातील ८३.१३ या बंद भावाच्या तुलनेत रुपयाने एका सत्रात थेट ३५ पैशांचे मूल्य गमावले. सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण वाढत रुपयाने ८३.५२ हा सर्वोच्च नीचांक गाठला होता. याआधी १३ डिसेंबर २०२३ रोजी रुपयाने ८३.४० ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली होती. डॉलर निर्देशांक शुक्रवारी ०.३१ टक्क्यांनी वाढून १०४.३२ वर पोहोचला आहे.
जागतिक पातळीवर जोखीम टाळण्यासाठी वाढती मागणी आणि कमी झालेल्या तरलतेमुळे डॉलरला अधिक बळ मिळाले आहे आणि त्या परिणामी रुपयात घसरण कायम आहे. परदेशी निधीचे माघारी जाणे सुरूच असल्याने डॉलरचा निर्गमन वाढल्याने रुपया अधिक कमजोर झाला आहे. कमकुवत युरो आणि पौंडमुळे अमेरिकी डॉलर अधिक मजबूत झाला आहे. स्विस नॅशनल बँकेने व्याजदर पाव टक्क्यांनी कमी करून १.५ टक्क्यांवर आणत बाजाराला आश्चर्यचकित केल्याने युरो घसरला. दुसरीकडे युरोपियन सेंट्रल बँकेने दर कपात केलेली नसून आणखी काही कालावधीत व्याजदर चढेच राहतील असे संकेत दिले आहेत. बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर ५.२५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवल्यानंतर पौंडही घसरला. अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारीही अमेरिकी डॉलरला अनुकूल असल्याचे शेअरखान बीएनपी पारिबाचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले.