मुंबई: डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी सलग आठव्या सत्रात ऐतिहासिक नीचांक गाठत, ८५.७९ पर्यंत ऱ्हास दाखविला. आयातदारांकडून डॉलरची मोठी मागणी आणि परदेशी निधीचे अविरत निर्गमन सुरू असल्याने स्थानिक चलनाच्या मूल्यावर ताण आणला. तथापि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून डॉलर विक्री झाल्याने रुपया सार्वकालिक तळातून डोके वर काढू शकला.
चलन बाजारात, रुपयाने डॉलरच्या तुलनेत कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि दिवसभरातील व्यवहारात त्याने ८५.७९ असा नीचांक आणि ८५.६८ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर ८५.७३ अर्थात बुधवारच्या ८५.६४ पातळीच्या तुलनेत ९ पैसे घसरणीसह तो स्थिरावला. गेल्या महिन्यात ८५.८० अशी सार्वकालिक नीचांकी पातळीला रुपयाने स्पर्श केला होता.
रिझर्व्ह बँक, तसेच सरकारी बँकांकडूनही घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी डॉलरची विक्री करून चलन बाजारात हस्तक्षेप सुरू आहे. परिणामी रुपयातील घसरण काही अंशी कमी होण्यास मदत होत आहे. गेल्या महिनाभरात, रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवस्थेतील तरलतेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आणि परकीय गंगाजळीमधील घसरण रोखण्यासाठी चलन बाजारात डॉलर खरेदी/विक्रीच्या स्वॅपसह चलन बाजारात हस्तक्षेप केला.
हेही वाचा : तीन दिवस बंद असलेले समीर ॲप पूर्ववत कार्यन्वित
डॉलरमागे ८६ ची पातळी समीप
अमेरिकी डॉलरची वाढती ताकद आणि आयातदारांकडून डॉलरसाठी वाढती मागणी, यामुळे रुपयातील घसरण वाढण्याची शक्यता आहे. शिवाय परदेशी निधीच्या निर्गमनामुळे रुपयावर आणखी दबाव येऊ शकतो. मात्र रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाला खालच्या पातळीवर आधार मिळू शकतो. येत्या काही सत्रात रुपया प्रति डॉलर ८५.५० ते ८६ च्या श्रेणीत व्यवहार करणे अपेक्षित आहे, असे मिरॅ ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक, अनुज चौधरी यांनी नमूद केले.