मुंबई : आखातातील युद्ध भडक्याच्या भीतीने भांडवली बाजारात झालेली मोठी पडझड आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीचा वाईट परिणाम भारतीय चलन अर्थात रुपयाच्या मूल्यावर दिसून आला. शुक्रवारी बंद झालेल्या प्रति डॉलर ८३.३८ या पातळीच्या तुलनेत रुपयाने आणखी ७ पैसे गमावत सोमवारी प्रति डॉलर ८३.४५ या आजवरच्या सर्वात नीचांकी पातळीवर बंद नोंदवला.
हेही वाचा >>> टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
रुपयाने एप्रिलच्या सुरुवातीला ८३.४५ ही सार्वकालिक नीचांकी पातळी गाठली होती. सोमवारी रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य डॉलर विक्रीमुळे रुपयाच्या मूल्य ऱ्हासावर अंकुश ठेवण्यास मदत झाली असली, तरी विक्रमी नीचांकाचीच बरोबरी त्याने साधली. आंतरबँक चलन बाजारातील सोमवारच्या व्यवहार सत्राची सुरुवात ८३.४६ या ऐतिहासिक तळापासून रूपयाने केली. सत्रांतर्गत ही घसरण वाढत प्रति डॉलर ८३.४७ पर्यंत गेली होती.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 15 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना फुटला घाम, १० ग्रॅमचा दर ऐकून व्हाल थक्क
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर तेलसंपन्न पश्चिम आशियातील संघर्ष वाढत जाण्याची जोखीम निर्माण झाल्यामुळे भयग्रस्त गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीने सोमवारी भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांची मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारपाठोपाठ, सोमवारच्या सत्रातही सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींनी एक टक्क्याहून अधिक गटांगळी घेतली आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या मत्तेत तब्बल ५.१८ लाख कोटी रुपयांचे नुकसान पाहावे लागले.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सर्वच आशियाई चलनांवर आणि मालमत्ता वर्गावर परिणाम दिसून आला आहे. तूर्त रुपयातील अस्थिरता रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक देखील बाजारात सक्रियपणे हस्तक्षेप करत आहे. तथापि, जर इस्रायल-इराण युद्ध परिस्थिती बिघडली तर रुपयाच्या मूल्यावर ताण वाढत जाईल, असा शेअरखान बीएनपी परिबाचे विश्लेषक अनुज चौधरी यांचा होरा आहे. व्यापारात व्यत्ययामुळे भारताकडून आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमती कडाडल्यास रुपयाची घसरण प्रति डॉलर ८३.८० पर्यंत वाढू शकेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.