मुंबई: सलग सातव्या सत्रात वाढीचा क्रम कायम ठेवत सोमवारी रुपया ३१ पैशांनी वाढून प्रति डॉलर ८५.६७ वर बंद झाला. ज्यामुळे या चलनाने तब्बल दीड रुपयांहून अधिक कमाईसह २०२५ मधील सर्व नुकसान भरून काढले आहे. देशांतर्गत भांडवली बाजारातील सेन्सेक्स-निफ्टीची दौड आणि तेथे परदेशी भांडवलाच्या नव्याने सुरू झालेल्या प्रवाहाचा चलनाच्या मूल्याला पाठबळ मिळाले.

जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या स्थिरावलेल्या किमती आणि डॉलरमधील निरंतर कमकुवतपणा यामुळेही चलन बाजारातील भावनांना बळकटी मिळाली. आंतरबँक चलन विनिमय बाजारात सोमवारी रुपया ८५.९३ वर खुला झाला, नंतर त्याने ८५.४९ च्या दिवसांतील उच्चांकापर्यंत मजल मारली. एकेसमयी तो प्रति डॉलर ८६.०१ च्या नीचांकी पातळीवरही पोहोचला होता. तथापि मागील बंद पातळीपेक्षा ३१ पैशांनी वाढ साधत तो ८५.६७ वर स्थिरावला.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची ही सलग सातवी वाढ असून, या काळात त्याने एकूण १५४ पैशांनी मजबूती मिळविली आहे. स्थानिक चलनाने यातून २०२५ मधील जवळपास तीन महिन्यांत झालेले सर्व नुकसान भरून काढले आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत ८५.६४ वर बंद झाला होता, जो स्तर त्याने सोमवारी पुन्हा कमावला. आर्थिक वर्षाची अखेर असल्याने व्यवहारांत आपसमेळ साधण्यासाठी विदेशी बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्यामुळे रुपयाला वार्षिक तोटा भरून काढता आला, असे विश्लेषकांनी सांगितले.