मुंबई: शेअर बाजाराच्या सध्याच्या सलग घसरणीमागे मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदारांची माघार आणि विक्री हे प्रमुख कारण आहे. उपलब्ध माहितीनुसार मागील चार सत्रांत तब्बल ४०,००० कोटींहून अधिकची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे. भारतीय बाजार नुकसानीत असताना, चीनच्या बाजाराच्या भरभराटीचे चित्रही या अंगाने बरेच बोलके आहे. सहा सत्रात सेन्सेक्स-निफ्टीचे ५ टक्क्यांनी नुकसान झाले, त्या उलट सरलेल्या आठवड्यात चीनच्या शांघायचा निर्देशांक २१ टक्क्यांनी, हँगसेंग निर्देशांक १५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी सलग सहाव्या सत्रात घसरणीचा क्रम सुरू ठेवला. दोन्ही निर्देशांकातील प्रत्येकी ५ टक्क्यांहून अधिक घसरण ही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या लक्षणीय विक्रीचा दृश्य परिणाम आहे. विशेषत: एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज अशा अग्रेसर समभागांमध्ये सुरू राहिलेल्या जोरदार विक्रीने सप्टेंबरअखेरीस ऐतिहासिक उच्चांक गाठलेल्या निर्देशांकांची तीव्रतेने माघार सुरू आहे.

हेही वाचा : Gold Silver Price : दसरा, दिवाळीपूर्वी सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरात आज काय आहेत नवे दर?

बाजाराने शुक्रवारप्रमाणेच, सोमवारच्या सत्रातही लक्षणीय अस्थिरता अनुभवली. ४५० अंशांच्या वाढीसह, सत्राची सकारात्मक सुरुवात करणारा सेन्सेक्स त्याच्या दिवसाच्या उच्चांकावरून १,०८८ अंकांनी घसरला. शुक्रवारच्या सत्रातही त्याने दिवसातील उच्चांकावरून तब्बल १६०० हून अधिक अंशांची भीतीदायी घसरण दाखविली होती. अखेर ६३८.४५ अंशांच्या (०.७८ टक्के) नुकसानीसह, तो ८१.०५०.०० पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २१८.८५ अंशांनी (०.८७ टक्के) घसरणीसह २४,७९५.७५ वर बंद झाला.

मोठ्या प्रमाणात भारताच्या बाजारात येणारे डॉलर, पौंड हे चीनकडे वळत आहेत. ‘भारतात विकून, चीनमध्ये खरेदी करा’ हे खास विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे अलीकडचे धोरण असामान्य असून, ते किती काळ सुरू राहते हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते, गेल्या आठवड्याभरात विदेशी गुंतवणूकदारांनी ४० हजार कोटी भारतीय बाजारातून काढून, चीनच्या बाजारात गुंतवणुकीसाठी वळविले आहेत.

हेही वाचा : जागतिक वस्तू दर पाहूनच व्याजदर कपात, रिझर्व्ह बँकेकडून यंदाही यथास्थिती राखली जाण्याचा अंदाज

‘एनएसडीएल’कडून उपलब्ध तपशिलानुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांत २७,१४२ कोटी रुपये मूल्याचे समभाग भारतीय बाजारातून विकले आहेत. शुक्रवारी आणि सोमवारीही त्यांनी प्रत्येकी ९,८०० कोटी रुपये मूल्याची समभाग विक्री केली, तर म्युच्युअल फंडांसह, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ८,९०५.०८ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली.

गेल्या आठवड्यात सलग पाच सत्रात, सेन्सेक्स ३,८८३.४० अंशांनी अर्थात ४.५३ टक्क्यांनी आणि निफ्टी १,१६४.३५ अंश किंवा ४.४४ टक्क्यांनी घसरून, तीन आठवड्यांच्या नीचांकावर स्थिरावला होता.

हेही वाचा : Gold Silver Rate Today : नवरात्रोत्सवादरम्यान सोने चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

पुढे काय?

० बाजारात सलगपणे सुरू असलेली विक्री पाहता, फेरउसळीसह उभारीची तज्ज्ञांना अपेक्षा

० गेल्या आठवड्यात बाजारातील तीव्र घसरण पाहता, अल्पावधीत हे चक्र उलटत असल्याचे दिसायला हवे, असे मत स्टॉकबॉक्सचे संशोधनप्रमुख मनीष चौधरी यांनी व्यक्त केले.

० त्यांंच्या मते, रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचे बुधवारी पतधोरण बैठकीतील निर्णयासंबंधाने समालोचन आणि त्यानंतर सुरू होत असलेल्या कंपन्यांच्या तिमाही निकालातील कामगिरीवर बाजाराचा आगामी कल अवलंबून असेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian stock market 40000 crores investment diverted from indian stock market to china print eco news css