मुंबईः अमेरिकेतील व्याजाच्या दरात कोणताही बदल न करण्याच्या अपेक्षेप्रमाणे आलेल्या निर्णयाचे गुरुवारी (३० जानेवारी) भारतीय शेअर बाजारांनी स्वागत केले आणि सलग तिसऱ्या निर्देशांकांनी मजबुती दर्शविली. गुंतवणूकदारांना आता वित्तीय शिस्तीत संतुलनासह, येणारा केंद्रीय अर्थसंकल्पातून मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला तरतरी देणाऱ्या धडाकेबाज घोषणांची आशा असल्याचे गुरुवारच्या व्यवहारांनी दाखवून दिले.
गुरुवारचे बंद होताना, सेन्सेक्स २२६.८५ अंशांनी (०.३०%) वाढून ७६,७५९.८१ या पातळीवर स्थिरावला आणि निफ्टी निर्देशांक ८६.४० अंशांनी (०.३७%) वाढून २३,२४९.५० वर बंद झाला. निफ्टी निर्देशांक २३,३०० या तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या (२० दिवसांची चलत सरासरी स्तर) पातळीपुढे काही काळ व्यवहार करीत होता. मात्र गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीने त्याला ही पातळी टिकवून ठेवता आली नाही. सेन्सेक्स देखील सत्राच्या पूर्वार्धात ७७ हजारांनजीक पोहोचला आणि तेथून तो खाली आला. तुलनेने अस्थिर राहिलेल्या सत्रात, मुंबई शेअर बाजारात २०४१ शेअर्स वधारले, तर घसरणाऱ्या शेअर्सची संख्या १७४१ अशी जवळपास सारखीच राहिली.
बाजारातील अस्थिरता ही मासिक निफ्टी एफ अँड ओ अर्थात वायदे मालिकेची आज मुदत संपल्याने प्रामुख्याने होती. दुपारी २ वाजल्यानंतर नफावसुलीने बाजार निर्देशांक काही काळ नकारात्मक पातळीवरही व्यवहार करत होते. पण अल्पावधीत ते सावरतानाही दिसून आले.
अर्थसंकल्पातील घोषणा ठरतील वळणबिंदू
आगामी १ फेब्रवारीला येणारा अर्थसंकल्प हा शेअर बाजारासाठी एक वळणबिंदू ठरू शकेल. त्या माध्यमातून अर्थव्यवस्थेची जोमदार वाढ आणि ग्राहकांच्या मागणीला जोम देणाऱ्या धोरणात्मक तरतुदी केल्या गेल्यास, बाजारातील सध्याचा मंदीचा प्रवाह देखील उलटण्याची शक्यता आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर म्हणाले. भारताच्या आर्थिक वाढीचा दीर्घकालीन दृष्टिकोन अबाधित असल्याने, दुरावलेले परकीय गुंतवणूकदारही परतण्याची आशा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचे लाभार्थी ठरणाऱ्या शेअर्स आणि क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत संयमाने गुंतवणूक सुरू ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला.
व्याजदर कपातीबाबत आशावाद
रिझर्व्ह बँकेने बँकिंग प्रणालीमध्ये तरलता आणण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांकडे, पुढील महिन्यात संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. यामुळे विशेषतः खासगी बँकांच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात उत्साही खरेदी सुरू राहिली. परिणामी निफ्टी बँक Nifty Bank निर्देशांकाने तीन सत्रात मिळून जवळपास अडीच टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे.
क्षेत्रवार आणि शेअर्सनिशी कामगिरी कशी?
मागील सत्रांमध्ये प्रगती करणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्सना नफावसुलीचा फटका बसला आणि त्यात घसरण दिसून आली. बँकिंग आणि आयटी शेअर्समधील जोरदार तेजीमुळे मागील दोन दिवस बाजाराने उत्साही झेप घेतली होती. गुरुवारच्या सत्रात आयटी निर्देशांकही नरमताना दिसला. त्या उलट तेल आणि वायू, वीज, औषध निर्माण, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एफएमसीजी, स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या निर्देशांकात अर्धा ते एक टक्क्यांची वाढ झाली.
आघाडीच्या शेअर्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, हीरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, सिप्ला, पॉवर ग्रिड कॉर्प हे निफ्टीमधील प्रमुख वधारलेल्या कंपन्यांमध्ये होते, तर टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स हे तोट्यात होते. शेअर बाजाराच्या एकंदर व्याप्तीत संमिश्र स्वरूपाचा कल राहिला. परिणामी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.०२% असा नाममात्र वाढला, तर बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.०४% असा किंचित घसरला.