मुंबई: भारतीय भांडवली बाजाराने परताव्याच्या बाबतीत अमेरिकी भांडवली बाजाराला मात दिली असून, १९९० मध्ये १०० रुपये भारतीय शेअर बाजारात गुंतवल्यास त्याचे ९,५०० रुपये झाले असते, तर तेच १०० रुपये अमेरिकी बाजारात गुंतवले असते तर त्याचे फक्त ८,४०० रुपये झाले असते, असे मोतीलाल ओसवालच्या अहवालाने स्पष्ट केले आहे.
भारतीय शेअर बाजाराने १९९० पासून गुंतवणुकीत जवळपास ९५ पटीने वाढ साधणारा बहुप्रसवा परतावा दिला आहे. त्यावेळी गुंतविलेले १०० रुपये २०२४ मध्ये ९,५०० रुपये झाले आहेत. तर याच कालावधीत अमेरिकेत गुंतलेल्या १०० रुपयांचे ८,४०० रुपये झाले, असा अहवालाचा निष्कर्ष आहे. या अहवालात समभाग अर्थात इक्विटीमधील कामगिरीची तुलना सोने आणि रोखे यांसारख्या अन्य गुंतवणूक पर्यायांशीही करण्यात आली आहे. पारंपारिकपणे सुरक्षित-गुंतवणुकीचा पर्याय मानला जाणाऱ्या सोन्याने याच कालावधीत ३२ पट परतावा दिला आहे. म्हणजेच १९९० मध्ये १०० रुपये सोन्यात गुंतवले असते तर त्याचे मूल्य आज ३,२०० रुपये झाले असते. शेअर बाजाराच्या तुलनेत सोने गुंतवणुकीतून मिळणारा परतावा लक्षणीयरीत्या कमी आहे. तर यापेक्षा सुमार कामगिरी करणारा मालमत्ता वर्ग म्हणजे मुदत ठेवींचा असून, त्यात गुंतविलेले १०० रुपयांचे ३४ वर्षांत केवळ १,१०० रुपये झाले असते.
हेही वाचा >>>Sensex वर येईना, गुंतवणूकदारांची पुन्हा दैना; सलग पाचव्या सत्रात घसरण, निफ्टीचीही हाराकिरी!
नियमितपणे गुंतवणूक सुरू ठेवल्यास आणि गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यास, इच्छित गुंतवणूक ध्येयापर्यंत पोहोचण्याची शक्यता ही समभागांतील गुंतवणुकीतून शक्य आहे. अल्पावधीत बाजारावर बऱ्याचदा मंदीवाल्यांचा पगडा असतो, तेव्हा काही काळ पोर्टोफोलिओत नुकसान दिसू शकते. भांडवली बाजारातील गुंतवणुकीसाठी संयम सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मात्र बहुतेक गुंतवणूकदारांकडे संयमाचा अभाव असल्याने ते केवळ भावनांवर आधारित घाईने निर्णय घेतात. परिणामी स्वतःचेच अधिक नुकसान करून घेतात, असे गुंतवणूकदारांच्या वर्तनाबद्दल अहवालाने नमूद केले आहे.
दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याचीच
एक वर्ष हा कोणत्याही गुंतवणूक साधनांमधील गुंतवणुकीसाठी खूपच कमी कालावधी मानला जायला हवा. कारण या कालावधीत अस्थिरता खूप जास्त असल्याने गुंतवणूकदारांचे नुकसानही होऊ शकते, असे मोतीलाल ओसवालच्या अहवालात म्हटले आहे. एक तर ‘गुंतवणूक कशासाठी’ हे मनांत पक्के हवे आणि हे ठरविलेले आर्थिक उद्दिष्ट गाठायचे तर गुतंवणुकीला इच्छित वाढ साधण्यासाठी पुरेसा अवधी द्यायला हवा.