पीटीआय, नवी दिल्ली/ झुरिच
स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा ७० टक्क्यांनी घटला असून, तो आता अवघा ९,७७१ कोटी रुपये इतकाच आहे. काळा पैसा ठेवणाऱ्यांसाठी नंदनवनच मानले जाणाऱ्या स्वित्झर्लंड आता भारतीयांच्या पैशाचा ओघ ओसरत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
ताजी आकडेवारी जरी तेथील काळ्या पैशाचा अचूक अंदाज देणारी नसली, तरी सरलेल्या २०२३ सालात स्विस बँकांतील पैशात ७० टक्क्यांनी घट होऊन तो १.०४ अब्ज स्विस फ्रँकपर्यंत (९,७७१ कोटी रुपये) खाली आला आहे, असे तेथील मध्यवर्ती बँक म्हणजेच स्विस नॅशनल बँकेने गुरुवारी जाहीर केले. तर स्विस बँकांमधील इतर देशांच्या निधीच्या क्रमवारीत भारत ६७ व्या स्थानी आहे.
शिवाय या आकडेवारीत अनिवासी भारतीय, भारतीय नागरिकांनी त्यांच्या परदेशातील संस्थांच्या नावाने ठेवलेला पैसा समाविष्ट नाही. वर्ष २०२१ मध्ये ३.८३ अब्ज स्विस फ्रँकचा १४ वर्षांचा उच्चांक गाठल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी स्विस बँकांमधील भारतीयांचा एकूण निधी घटला आहे. मुख्यत्वे रोखे, बंध-पत्र (सिक्युरिटीज) आणि इतर विविध आर्थिक माध्यमातून ठेवलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने भारतीयांच्या स्विस बँकांमधील पैसा ओसरत आला आहे.
हेही वाचा >>>टाटांची वाणिज्य वाहने २ टक्क्यांनी महागणार
स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांची मालमत्ता ‘काळा पैसा’ मानली जाऊ शकत नाही. करचोरीविरुद्धच्या लढ्यात स्वित्झर्लंड सक्रियपणे भारताला पाठिंबा देतो, असे स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातील करविषयक माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण २०१८ पासून लागू आहे. या कराराअंतर्गत, २०१८ पासून स्विस वित्तीय संस्थांमध्ये खाती असलेल्या सर्व भारतीय नागरिकांची आर्थिक माहिती तपशीलवार भारतीय कर अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय असलेल्या व्यक्तींचे स्वित्झर्लंडला प्रथमदर्शनी पुरावे सादर केल्यानंतर त्या बँक खात्यांचे तपशील सक्रियपणे भारताला कळविले जात आहेत.
कुणाचा क्रमांक कितवा?
स्वित्झर्लंडमध्ये गुंतवण्यात आलेल्या एकूण सर्व देशांच्या पैशाचा विचार करता त्या देशातील बँकांकडे वर्ष २०२३ अखेर ९८३ अब्ज स्विस फ्रँक (सुमारे ९२ लाख कोटींहून अधिक) एवढा परकीय निधी आहे. २०२२ अखेर तो यापेक्षा अधिक १.१५ लाख कोटी स्विस फ्रँक होता. ब्रिटन यात पहिल्या क्रमांकावर असून २०२३ अखेरीस तेथील व्यक्ती व संस्था यांचा सर्वाधिक २५४ अब्ज स्विस फ्रँक इतका निधी स्विस बँकात आहे. त्यानंतर अमेरिका ७१ अब्ज स्विस फ्रँकसह दुसऱ्या स्थानावर आहे. फ्रान्स ६४ अब्ज स्विस फ्रँकसह तिसऱ्या स्थानी आहे. या तिघांच्या पाठोपाठ वेस्ट इंडिज बेटे, जर्मनी, हाँगकाँग, सिंगापूर, लक्झेंबर्ग आणि ग्वेर्नसे यांचा पहिल्या दहा देशांमध्ये समावेश आहे. भारताचे २०२२ च्या अखेरीस ४६ वे स्थान, जे आणखी खाली घसरून ६७ व्या स्थानी गेले आहे. पाकिस्तानच्या निधीमध्येदेखील घसरण झाली आहे, ती आता २८.६ कोटी स्विस फ्रँक इतकी मर्यादित आहे. तर बांगलादेशाचा निधी ५.५ कोटी स्विस फ्रँकवरून १.८ कोटी स्विस फ्रँकपर्यंत घसरला आहे. भारताप्रमाणेच स्विस बँकांमधील कथित काळ्या पैशाचा मुद्दा दोन शेजारील देशांमध्येही राजकीय तापमान वाढवणारा ठरला आहे.