नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनातील वाढ साडेतीन वर्षांनंतर पहिल्यांदाच नकारात्मक क्षेत्रात गेली असून, ऑगस्ट २०२४ मध्ये त्यात उणे १.८ टक्के अशी अधोगती झाल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. विशेषत: कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, सिमेंट आणि वीजनिर्मिती या क्षेत्रांच्या कामगिरीतील घसरणीचा हा परिणाम आहे. या आघाडीवर यापूर्वीचा नीचांक ४२ महिन्यांपूर्वी, फेब्रुवारी २०२१ मध्ये उणे (-) ३.३ टक्के नोंदवला गेला होता. 

आधीच्या महिन्यांत म्हणजेच, जुलै २०२४ मध्ये प्रमुख पायाभूत क्षेत्राच्या वाढीचा दर ६.१ टक्के होता. तर गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२३ मध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या प्रमुख क्षेत्रांची वाढ १३.४ टक्के अशी होती.

हेही वाचा >>> ‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन

चालू आर्थिक वर्षात एप्रिल-ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत प्रमुख पायाभूत क्षेत्रांचे उत्पादन मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ८ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत काहीशा घसरणीसह ४.६ टक्क्यांची वाढले आहे. देशातील कारखानदारीच्या आरोग्यमानाचे मापन असणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकांत या आठ प्रमुख क्षेत्रांचे ४०.२७ टक्के योगदान असते. प्रमुख क्षेत्रांची ताजी नकारात्मक आकडेवारी पाहता या निर्देशांक तीव्र घसरणीसह नोंदवला जाण्याचे संकेत आहेत.

सरलेल्या ऑगस्टमध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, सिमेंट आणि वीज यांच्या उत्पादनांत घसरण झाली असून, ते शून्याखाली अनुक्रमे ८.१ टक्के, ३.४ टक्के, ३.६ टक्के, १ टक्के, ३ टक्के आणि ५ टक्के असे घटले आहे. त्या उलट या महिन्यामध्ये खताचे उत्पादन ३.२ टक्क्यांनी वाढले. पोलाद उत्पादनाचा वाढीचा दर मागील वर्षी याच महिन्यात १६.४ टक्के होता, तो यंदा ४.५ टक्क्यांवर घसरला आहे.

ताजा प्रवाह लक्षात घेता, औद्योगिक उत्पादन निर्देशांकांची वाढ जुलै २०२४ मधील ४.८ टक्क्यांवरून, ऑगस्टमध्ये तीव्र रूपात म्हणजेच जेमतेम १ टक्क्यांपर्यंत नोंदवली जाईल. हंगामी पाऊस उशीरापर्यंत सुरू राहिल्याने सप्टेंबरमध्ये प्रमुख क्षेत्राचे उत्पादन मंदावण्याची शक्यता आहे. – आदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा लिमिटेड