मुंबई : सरलेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात देशाची वस्तूमालाची निर्यात सुमारे एक टक्क्याने घसरून ३८.०१ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात (डिसेंबर २०२३) ३८.३९ टक्के नोंदवली गेली होती, असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले.एकीकडे निर्यात घसरली असताना आयातीमध्ये ४.८ टक्क्यांची वाढ होऊन ती ५९.९५ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ५७.१५ अब्ज डॉलर राहिली होती. आयात आणि निर्यातीतील तफावत म्हणजेच व्यापार तूट डिसेंबर २०२४ मध्ये २१.९४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
हेही वाचा >>> Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
विद्यमान आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत निर्यात १.६ टक्क्यांनी वाढून ३२१.७१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आणि आयात ५.१५ टक्क्यांनी वाढून ५३२.४८ अब्ज डॉलर झाली आहे, असे वाणिज्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणात बदलांचे संकेत दिले आहेत. हे धोरण अधिक संरक्षणवादाकडे झुकेल, परिणामी अनेक देशांमधून होणाऱ्या आयातीवरील करांत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक देशांमधील अंतर्गत औद्योगिक धोरणे यातून बदलतील आणि विस्तारित व्यापार युद्धांचा धोका आणि सद्य:स्थितीतील भू-राजकीय तणाव यांचा २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक व्यापार संघटनेने २०२५ मध्ये व्यापार वाढीचा अंदाज ३.३ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तर वर्ष २०२४ साठी व्यापार वाढीचा अंदाज २.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जो मागील २.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. मात्र प्रादेशिक संघर्ष, भू-राजकीय तणाव आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आखाती देशांमधील संघर्ष वाढल्यास, त्याचा परिणाम खनिज तेलाच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे. परिणामी देशाच्या आयात खर्चात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने आयातीवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक वाढ मंदावण्याची भीती आहे.