मुंबई: भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, १५ डिसेंबर रोजी समाप्त आठवड्याच्या अवधीत गंगाजळी ९.११ अब्ज डॉलरने वाढून ६१५.९७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेली आकडेवारी स्पष्ट करते.
आधीच्या आठवड्यात परकीय चलन गंगाजळी ६०६.८५ अब्ज डॉलर पातळीवर होती. सध्या भांडवली बाजारातील विक्रमी तेजी आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू राहिलेला डॉलर-पौंडाचा लक्षणीय ओघ पाहता, गंगाजळीने पुन्हा एकदा ६१५ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये, देशाच्या परकीय चलन गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठली होती. तर भांडवली बाजारात झालेली घसरण, रशिया-युक्रेन युद्ध, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये ती ५२४.५२ अशी दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर गडगडली होती.