नवी दिल्ली : भारताच्या भांडवली बाजारावरील आर्थिक मंदीचे सावट आणि उत्पन्नातील घसरणीचा सर्वात वाईट टप्पा संपुष्टात येण्याची वेळ समीप आहे, असे भाकीत जागतिक वित्तीय कंपनी गोल्डमन सॅक्सने केले आहे.

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉल आणि मिड-कॅप समभागांमध्ये झालेली देशांतर्गत गुंतवणूक आणि अमेरिकेच्या नव्या व्यापार धोरणांमुळे नजीकच्या काळात बाजारात अस्थिरता कायम राहणे शक्य आहे. आर्थिक वाढ आणि उत्पन्नाच्या मार्गाच्या बाबतीत अजूनही काही समस्या कायम आहेत. गोल्डमन सॅक्सने उदयोन्मुख बाजारपेठांच्या श्रेणीतील भारताबद्दल आशावादी भूमिका कायम ठेवली आहे. गुंतवणूकदारांना मजबूत कमाईची दृश्यमानता आणि दर्जेदार वाढ असलेल्या समभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा तिने सल्ला दिला आहे.

निफ्टी ५० निर्देशांक सप्टेंबर २०२४ मध्ये त्याच्या शिखरावरून १० टक्क्यांनी घसरला. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे कंपन्यांच्या कमाईमध्ये झालेली घसरण, एकंदर बाजारातील मंदीसदृश परिस्थिती आणि सर्व क्षेत्रांमधील मूल्यांकनात तीव्र घट झाल्यामुळे परिस्थिती प्रतिकूल बनली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपन्यांच्या प्रति समभाग कमाईमध्ये (ईपीएस) सरासरी ७ टक्क्यांनी घट झाली आहे. अलिकडच्या आर्थिक मंदीचे कारण संरचनात्मक कमकुवतपणाऐवजी चक्रीय घटकांना दिले आहे. वर्ष २०२३ च्या अखेरीस कठोर पतधोरण, सावध आर्थिक दृष्टिकोन, परकीय चलनाच्या निर्गमनामुळे कमी झालेल्या तरलता भरून काढणारे उपाय आणि वित्तीय शिस्त यांसारख्या धोरणात्मक उपायांनी कमकुवत विकासाच्या गतीला हातभार लावला. अलिकडे केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेली प्राप्तिकर सवलत आणि रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या पाव टक्के कपातीने अर्थव्यवस्थेला सावरण्यास आणखी हातभार लागेल, असे अहवालाने नमूद केले आहे.

सावध दृष्टीकोन आवश्यक

विद्यमान २०२५ सालाच्या दुसऱ्या सहामाहीत भारताचा विकास वेग ६.४ टक्क्यांपर्यंत गती गाठू शकेल, असा गोल्डमन सॅक्सच्या अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. या आशावादानंतरही, जोखीम अजूनही कायम आहे. विशेषतः भारतीय वस्तूंवर अमेरिकेच्या संभाव्य व्यापार शुल्कामुळे आर्थिक विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असा त्यांचा इशाराही आहे. एकंदरीत, मंदीचा सर्वात वाईट टप्पा मागे पडला असला तरी, गुंतवणूकदारांनी बाजारातील अस्थिरता आणि भारताच्या आर्थिक दृष्टिकोनावर परिणाम करणाऱ्या बाह्य जोखमींबद्दल सावध राहणे आवश्यक आहे.