मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत परकीय गुंतवणूकदार हे स्थानिक भांडवली बाजारात निरंतर खरेदीदाराच्या भूमिकेत राहिले असून, त्यातून बाजारात सुरू असलेल्या दमदार तेजीला इंधन मिळून प्रमुख निर्देशांक नवनवीन शिखरे सर करत चालले आहेत. १ एप्रिलपासून जुलैअखेरपर्यंत चार महिन्यांत त्यांची एकंदर गुंतवणूक ही १.४८ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी असून, सरलेल्या जुलैमध्येच त्यात ४३,३६५ कोटी रुपयांची भर पडली आहे.
कंपन्यांच्या मिळकत स्थितीत दिसून येत असलेली लक्षणीय सुधारणा आणि जोडीला भारतीय अर्थव्यवस्थेकडून दिले जात असलेले ठोस उभारीचे संकेत पाहता परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सरलेल्या जुलैमध्ये त्यांचा समभाग खरेदीचा धडाका सुरू ठेवला. मागील आठवड्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी परकीय गुंतवणूकदार दोन सत्रांमध्ये निव्वळ विक्रेते बनल्याचे दिसून आले असले तरी, संपूर्ण जुलै महिन्यात (सोमवार, ३१ जुलैच्या सत्राचा अपवाद केल्यास) त्यांची भारतीय भांडवली बाजारातील नक्त खरेदी ही ४५,३६५ कोटी रुपयांची राहिली.
भांडवली बाजारांकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, परकीय गुंतवणूकदार हे मार्चपासून सातत्याने भारतीय बाजारात खरेदी करत आहेत. त्यांच्या नक्त गुंतवणुकीने ४० हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याचा हा सलग तिसरा महिना आहे. जुलैमध्ये ४५,३६५ कोटी रुपये, तर जूनमध्ये त्यांनी ४७,१४८ कोटी रुपयांची नक्त खरेदी केली आहे. ऑगस्ट २०२२ नंतर परकीय गुंतवणूकदारांकडून झालेली दुसरी मोठी मासिक खरेदी ठरली असून, त्या महिन्यात ५१,२०४ कोटी रुपयांची खरेदी केली होती. मे महिन्यात ४३,८३८ कोटी रुपये, तर एप्रिलमध्ये त्यांच्याकडून ११,०१४ कोटी रुपयांचा नक्त ओघ राहिला. चालू वर्षात मार्चपूर्वी, म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे ३४,६२६ कोटी रुपये बाजारातून काढून घेतले होते.
चालू वर्षातील परकीय गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खरेदी धोरणावर बाह्य घटक जसे की डॉलर निर्देशांक, अमेरिकी रोख्यांचा परतावा दर आणि जागतिक बाजारातील नकारात्मक प्रवाह यांचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील सकारात्मकतेने त्यांना प्रभावित केले आणि हेच त्यांच्या निरंतर खरेदीचे मूलभूत कारण आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.
महागाई दरात दिसून आलेली नरमाई पाहता, रिझर्व्ह बँक व्याज दरवाढीचे चक्र थांबवेल या अपेक्षेने परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात तेजीपूरक उत्साह दाखवला. प्रत्यक्षात एप्रिलपासून सलग दोन बैठकांमध्ये मध्यवर्ती बँकेने व्याजदराबाबत जैसे थे दृष्टिकोन कायम ठेवला आहे.
निर्देशांकांत १८ टक्क्यांहून अधिक तेजी
उपलब्ध आकडेवारी पाहता, एप्रिलपासून परकीय गुंतवणूकदारांनी बाजारात प्रति सत्र सरासरी १,२०० कोटी रुपयांची खरेदी केली आहे. त्यांच्या या पाठबळामुळे बाजाराला दमदार चैतन्य प्राप्त झाले असून, सरलेल्या २० जुलैला सेन्सेक्सने ६७,६१९.१७ या ऐतिहासिक उच्चांकी स्तराला गवसणी घातली. २० मार्चच्या सेन्सेक्सने ५७,०८४.९१ या नीचांकापासून, चार महिन्यांत निर्देशांकाने तब्बल १०,५३५ अंशांची अर्थात १८.५ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. निफ्टी निर्देशांकानेदेखील या चार महिन्यांत १६,८२८.३५ (२० मार्च २०२३) नीचांकापासून, १९,९९१.८५ (२० जुलै २०२३) अशा सार्वकालिक उच्चांकापर्यंतचा पल्ला गाठताना, तब्बल ३,१६३ अंशांनी (१८.८ टक्क्यांनी) मजल मारली आहे.