पीटीआय, नवी दिल्ली
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने मंगळवारी एकास एक (१:१) बक्षीस समभागाची (बोनस शेअर) घोषणा केली. किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कंपनीने बक्षीस समभागाची घोषणा केली असून भागधारकांच्या हाती असलेल्या प्रत्येक समभागासाठी एक विनामूल्य समभाग मिळणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने पहिल्यांदाच बक्षीस समभाग देऊ केले आहेत. लवकरच कंपनीकडून भागधारकांच्या पात्रतेची अर्थात रेकॉर्ड तारीख घोषित केली जाईल.
हेही वाचा : अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
बक्षीस समभागानंतर कंपनीचे भागभांडवल १४० कोटी रुपयांवरून २८० कोटी रुपये होईल. बक्षीस समभागासाठी १४० कोटी रुपयांचे भांडवल कंपनीच्या राखीव निधीतून खर्च केले जाईल. कंपनीच्या राखीव गंगाजळीत एकूण ८,४११ कोटी रुपयांचा निधी आहे. येत्या दोन महिन्यात भागधारकांना बक्षीस समभाग मिळतील. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड ही वाहनांसाठी सीएनजी आणि घरगुती आणि उद्योगांना वापरासाठी पीएनजीचा पुरवठा करते. दिल्ली, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम शहरांबरोबरच हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये देखील तिचा व्यवसाय आहे. मुंबई शेअर बाजारात इंद्रप्रस्थ गॅसचा समभाग मंगळवारी ३८६ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या बाजार भावानुसार, कंपनीचे २७,०२० कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.