पीटीआय, नवी दिल्ली

इंडसइंड बँकेला तिच्या डेरिव्हेटिव्ह सौद्यांच्या हिशेबात विसंगती आढळल्यानंतर त्या तफावतींची मात्रा आणि झालेले एकूण नुकसान शोधण्यासाठी बाह्य लेखापरीक्षकाची नियुक्ती बँकेने शुक्रवारी केली.

इंडसइंड बँकेने तिच्या डेरिव्हेटिव्ह सौद्यांच्या हिशेबात विसंगती आढळल्याचा शेअर बाजारांना सूचित करणारा उलगडा १० मार्चला केला. बँकेच्या विदेशी चलनांतील व्यवहाराशी संबंधित हिशेबी चूक झाल्याच्या या खुलाशातून बँकेला झालेला तोटा साधारण २,१०० कोटी रुपयांच्या घरात जाणारा असल्याचे अंतर्गत छाननीतून आढळल्याचे बँकेने म्हटले आहे. या सौद्यांसाठी झालेला खर्च बँकेकडून कमी लेखला गेल्याचे आणि ही बाब सप्टेंबर २०२४ मध्ये लक्षात आल्याचे बँकेकडून सांगितले गेले. नेमके त्या आधीच उच्चाधिकाऱ्यांकडून समभाग विक्रीदेखील झाल्याचे आता धक्कादायकरित्या स्पष्ट होत आहे.

गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत, विसंगतींचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि त्या संबंधाने व्यापक मूल्यांकनासाठी त्रयस्थ व्यावसायिक लेखापरीक्षण कंपनीची नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, असे बँकेने नियामकाला कळविले. याशिवाय, हे लेखापरीक्षक त्रुटी ओळखून आणि हिशेबात विसंगती आढळल्याबद्दल दोषारोप आणि जबाबदारीही निश्चित करतील.

आठवड्याच्या सुरुवातीला, इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडचे (आयआयएचएल) अध्यक्ष अशोक हिंदुजा म्हणाले की, हिशोबातील तफावतीमुळे इंडसइंड बँकेला त्याच्या निव्वळ मूल्यात मोठा तोटा होणार असला तरी, प्रवर्तकांकडून कोणत्याही नवीन भांडवलाची बँकेने मागणी केलेली नाही. हिंदुजा समूहाची गुंतवणूक शाखा असलेल्या आयआयएचएलला अलीकडेच इंडसइंड बँकेतील आपला हिस्सा १६ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅकेची तत्वतः मंजुरी मिळाली आहे.

Story img Loader