नवी दिल्लीः देशाच्या औद्योगिक उत्पादनातील वाढीचा दर मार्चमध्ये ३ टक्क्यांवर पोहोचला आहे. आधीच्या फेब्रुवारी महिन्यातील २.७ टक्क्यांच्या तुलनेत तो किंचित वाढला असला तरी वार्षिक तुलनेत त्यात घसरण झाली आहे. दरम्यान, सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादनात घट झाली असून, वाढीचा दर ४ टक्के नोंदविण्यात आला आहे, जो आधीच्या आर्थिक वर्षात ५.९ टक्के होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, यंदा फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये औद्योगिक उत्पादन वाढीचा दर ५.५ टक्के होता. निर्मिती, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रांची वाईट कामगिरी यासाठी कारणीभूत ठरली आहे. दरम्यान, सरकारने फेब्रुवारीतील औद्योगिक उत्पादनातील वाढीचा सुधारित दर जाहीर केला असून, तो २.७ टक्के आहे. आधी हा दर २.९ टक्के अंदाजण्यात आला होता.

क्षेत्रवार कामगिरीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकात सर्वात जास्त भारमान असलेल्या निर्मिती क्षेत्राने ३ टक्के दराने वाढ साधली, जो फेब्रुवारीमधील २.९ टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे. निर्मिती क्षेत्रात, २३ पैकी १३ उद्योग गटांनी सकारात्मक वाढ नोंदवली. विद्युत उपकरणांच्या उत्पादनात १५.७ टक्के वाढ नोंदवण्यात आली, त्यानंतर मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलर्समध्ये १०.३ टक्के आणि मूलभूत धातूंमध्ये ६.९ टक्के वाढ झाली.

त्या उलट गेल्या वर्षी मार्च महिन्यातील १.३ टक्क्यांच्या खाणकाम क्षेत्राचा वाढीचा दर यंदा ०.४ टक्क्यावर घसरला आहे. तसेच, वीजनिर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर गेल्या वर्षीच्या ८.६ टक्क्यांच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये ६.३ टक्क्यांवर ओसरला आहे.