नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची सक्रियता सरलेल्या मार्च महिन्यात तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठल्याचे मासिक सर्वेक्षणातून सोमवारी स्पष्ट झाले. नवीन कामाच्या प्रमाणात वाढ, पूर्वपदावर आलेली मागणी आणि किमतीचा कमी झालेला दबाव या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एस अँड पी ग्लोबल इंडिया’द्वारे केलेल्या सर्वेक्षणावर बेतलेला निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा (पीएमआय) निर्देशांक मार्चमध्ये ५६.४ गुणांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात तो ५५.३ असा नोंदला गेला होता. चालू वर्षी निर्मिती क्षेत्रातील वाढ सकारात्मक राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सलग एकविसाव्या महिन्यात या निर्देशांकाचा कल विस्तारदर्शक राहिला आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर असेल तर ते विस्तारदर्शक आणि त्याखाली असेल तर घसरणीचे मानले जाते.

हेही वाचा >>> ‘ओपेक प्लस’चा अतिरिक्त उत्पादन कपातीचा निर्णय; तेलाचा १०० डॉलरपर्यंत भडका शक्य

सर्वेक्षणानुसार, कच्च्या मालाच्या महागाईने अडीच वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. विस्कटलेल्या पुरवठा साखळीमुळे निर्माण झालेला पुरवठ्यावरील ताण ओसरला आहे आणि कच्च्या मालाची वाढलेली उपलब्धता या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. अनेक कंपन्यांनी वस्तूंचा साठा वाढवण्यावर भर दिला आहे. कारण पुढील काही महिन्यांत विक्री अधिक वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, चिंतेची बाब हीच की, वस्तू उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी मार्च महिन्यात रोजगारात दखल घ्यावी इतकी वाढ नोंदवलेली नाही.

भारतीय उत्पादित वस्तूंच्या मागणीत मार्च महिन्यात मोठी वाढ नोंदण्यात आली. कंपन्यांना मिळणाऱ्या नवीन कामाच्या प्रमाणात तीन महिन्यांत झालेली ही सर्वोत्तम वाढ आहे. यामुळे उत्पादनातही वाढ होत आहे. –  पॉलिआना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrial production growth india manufacturing sector hits 3 month high in march zws
First published on: 04-04-2023 at 10:59 IST