पीटीआय, नवी दिल्ली
देशाच्या कारखानदारीतील उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने सरलेल्या ऑक्टोबरमध्ये ३.५ टक्के वाढ नोंदविल्याचे गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या महिन्यांतील ३.१ टक्क्यांच्या तुलनेत ते वधारले असले तरी गेल्या वर्षीच्या म्हणजेच ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत त्यात घट झाली आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२३ औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने ११.९ टक्के वाढ नोंदवली होती. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये मुख्यतः ऊर्जा, खाणकाम आणि उत्पादन क्षेत्राची वाईट कामगिरी ही निर्देशांकाच्या ३.५ टक्क्यांपर्यंत घसरणीस कारणीभूत ठरल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. या वर्षी ऑगस्टमध्ये उत्पादन वाढीचा दर ०.१ टक्क्यांपर्यत आक्रसला होता, हे पाहता ऑक्टोबरमध्ये या दराने तीन महिन्यांतील उच्चांक गाठल्याचेही म्हणता येईल.
हेही वाचा : चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये कारखानदारी उत्पादनातील वाढ मागील वर्षाच्या ७ टक्क्यांच्या तुलनेत ४ टक्क्यांपर्यंत रोडावली आहे. आकडेवारीनुसार, खाण उत्पादन वाढ ऑक्टोबरमध्ये ०.९ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी वर्षभरापूर्वी १३.१ टक्क्यांनी विस्तारली होती. ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राची वाढ गेल्या वर्षीच्या १०.६ टक्क्यांवरून ४.१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. त्याचप्रमाणे, ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील वाढ वर्षभरापूर्वीच्या २०.४ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत खालावली. भांडवली वस्तूंच्या विभागातील वाढ ऑक्टोबर २०२४ मध्ये ३.१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी मागील वर्षी २१.७ टक्के होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंचे उत्पादन १५.९ टक्के होते, ते आता केवळ ५.९ टक्क्यांनी विस्तारले आहे.
पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तू क्षेत्रातील वाढ ऑक्टोबर २०२४ मध्ये ४ टक्के नोंदवली गेली, ज्यामध्ये मागील वर्षी याच महिन्यांत १२.६ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनांत या वर्षी ऑक्टोबरमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, गेल्यावर्षी ते ११.४ टक्क्यांनी वाढले होते.
हेही वाचा : किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
‘आयआयपी’ म्हणजे काय?
देशात ठराविक कालावधीत औद्योगिक उत्पादनांत वाढ किंवा घट झाली हे ‘इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन’ म्हणजेच ‘आयआयपी’ या निर्देशांकातून समजते. देशाच्या दीर्घकालीन प्रगतीचा कणा म्हणजेच देशातील द्वितीय (सेकंडरी) क्षेत्र अर्थात कारखानदारी क्षेत्र! कोणत्याही कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करणे, वस्तूचे मूल्य वाढवणे हे काम कारखानदारी क्षेत्राकडून केले जाते. उद्योग हे रोजगार निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात.