पीटीआय, नवी दिल्ली

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या फेब्रुवारीमध्ये २.९ टक्क्यांवर नोंदवला गेल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक असलेल्या या निर्देशांकाने, मुख्यतः निर्मिती क्षेत्र, खाणकाम आणि वीज क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे सहा महिन्यांच्या नीचांकाला गाठले आहे.

गेल्यावर्षी याच कालावधीत म्हणजेच फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘आयआयपी’ ५.६ टक्के नोंदवला गेला होता, तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनातील वाढ शून्यावर पोहोचली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये खाणकामाची कामगिरी सुमार राहिली असून या क्षेत्रातून उत्पादन गेल्या वर्षीच्या ८.१ टक्क्यांवरून, यंदा १.६ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तर वीजनिर्मिती क्षेत्राची वाढ गेल्या वर्षीच्या ७.६ टक्क्यांवरून, ३.६ टक्क्यांपर्यंत खुंटली आहे.

अपेक्षेप्रमाणे, लीप वर्षामुळे फेब्रुवारी २०२५ मध्ये वार्षिक आधारावर ‘आयआयपी’मध्ये जानेवारी २०२५ मधील ५.२ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. मार्च २०२५ मध्ये खाणकामाच्या वाढीची कामगिरी खालावणे अपेक्षित असले तरी, वीजनिर्मितीतील वाढीतून ती भरून निघण्याची शक्यता आहे, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या.

एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत, ‘आयआयपी’ वाढ सरासरी ४.१ टक्के राहिली, जी मागील वर्षातील याच कालावधीतील सरासरी ६ टक्के पातळीच्या तुलनेत लक्षणीय घटली आहे.