मुंबई : देशाच्या उद्योगजगतात परोपकार जपण्यात यंदा एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर यांनी २,०४२ कोटी रुपयांच्या वार्षिक देणगीसह देशातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी दानकार्य कोषात सरासरी प्रतिदिवस ५.६ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. देशभरात १९९ व्यक्तींनी वर्षभरात ८,४४५ कोटी रुपयांची देणगी दिली, जे आर्थिक वर्ष २०२२ मधील १०८ व्यक्तींनी केलेल्या दानकर्मापेक्षा ५९ टक्क्यांनी अधिक आहे. भारतातील परोपकारकर्त्यांची २०२३ सालाची (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) यादी ‘एडेलगिव्ह हुरून’ यांनी संयुक्त सर्वेक्षणाअंती गुरुवारी प्रसिद्ध केली.

दानकार्यात आघाडीवर असणारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रोचे अझीम प्रेमजी हे या सूचीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १,७७४ कोटी रुपयांचे वार्षिक दानकार्य केले आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी ३७६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यंदा या यादीत दलाली संस्था असलेल्या झिरोधाचे निखिल कामथ हे सर्वात तरुण दानकार्य करणारे ठरले आहे. यादीत १२ व्या स्थानावर असलेल्या कामथ बंधूंनी वर्षभरात ११० कोटी रुपयांचे दानकार्य केले.

हेही वाचा : रतन टाटांची आवडती कंपनी ‘तोट्यात’; इथूनच करिअरला केली सुरुवात

रोहिणी नीलेकणी यांनी सरलेल्या वर्षात १७० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्या या यादीत दहाव्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ अनु आगा (४० व्या स्थानावर) आणि लीना गांधी (४१ व्या स्थानावर) यांनी प्रत्येकी २३ कोटी रुपयांचे दानकर्म केले आहे. या यादीत एकूण सात महिला समाजसेवी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : UPI युजर्सची संख्या वाढतीच, सलग तिसऱ्या महिन्यात १ हजार कोटींहून अधिक व्यवहार

यंदा भारतात एकूण १४ व्यक्तींनी १०० कोटी रुपयांहून अधिक वार्षिक देणगी दिली, २४ जणांनी ५० कोटी रुपयांहून अधिक आणि ४७ जणांनी २० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली असल्याचे हुरूनने तयार केलेली सूची दर्शविते.

कोणत्या क्षेत्रासाठी किती योगदान?

शिक्षण क्षेत्रासाठी ६२ परोपकारी व्यक्तींनी एकत्रितपणे १,५४७ कोटी रुपयांचे योगदान दिले आहेत. त्यापाठोपाठ कला क्षेत्रासाठी १,३४५ कोटी रुपये आणि आरोग्य सेवांसाठी ६३३ कोटी रुपये मिळाले आहेत. आर्थिक वर्ष २०२० मध्ये दानशूर व्यक्तींनी एकत्रितपणे ११,९८४ कोटी रुपयांचे दानकर्म केले होते. तर आर्थिक वर्ष २०२१ मध्येते ते १४,७५५ कोटी रुपये राहिले होते. सरलेल्या वर्षात मात्र ते ८,४४५ कोटी रुपयांवर मर्यादित राहिले.

हेही वाचा : खुशखबर ! २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​चे व्याज २४ कोटी ग्राहकांच्या खात्यात जमा, कामगार मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई आघाडीवर…

देशातील सर्वात दानशूर लोकांच्या यादीत मुंबई आघाडीवर असून दानधर्म केलेल्यांपैकी ३९ व्यक्ती मुंबईतील आहे. त्यानंतर नवी दिल्ली १९ टक्के आणि बेंगळूरु १३ व्यक्तींसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थनावर आहे. कुमार मंगलम बिर्ला, गौतम अदानी, बजाज कुटुंब, अनिल अग्रवाल, नंदन नीलेकणी आणि सायरस आणि अदार पूनावाला यांचा आघाडीच्या १० परोपकारी व्यक्तींमध्ये समावेश आहे.

Story img Loader