पीटीआय, नवी दिल्ली
खाद्यवस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सरलेल्या सप्टेंबर महिन्यात, किरकोळ महागाई दर, आधीच्या महिन्यातील ३.६५ टक्क्यांवरून मोठी झेप घेत ५.४९ टक्क्यांवर पोहोचला. हा या महागाईचा गत नऊ महिन्यांतील उच्चांक असून, यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये महागाईने ५.६९ टक्क्यांचा उच्चांक नोंदवला होता. दुसरीकडे घाऊक महागाईत वाढ होऊन ती १.८४ टक्क्यांवर पोहोचल्याचे सोमवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर आधीचे दोन महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये ४ टक्क्यांखाली रोडावल्याचे दिसून आले होते. महागाईवर नियंत्रणाचे वैधानिक दायित्व असलेल्या रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा महागाईत उतार चार वर्षांत पहिल्यांदाच दिसून आला होता. तथापि हा दिलासा अल्पकालीन ठरल्याचे सप्टेंबरच्या जाहीर झालेल्या आकड्यांनी सोमवारी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>तुमच्या Gross Salary पेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारी Net Salary कमी का असते? हे बाकीचे पैसे जातात कुठे?

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई दराचा प्रमुख घटक असलेली खाद्यान्न महागाई ही ऑगस्टमधील ५.६६ टक्क्यांवरून, सप्टेंबरमध्ये ९.२४ टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात खाद्यान्नांतील महागाई ६.६२ टक्के होती, तर घाऊक महागाई दर ५.०२ टक्के होता.

रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरच्या सुरुवातीला द्विमासिक पतधोरण आढाव्यात, व्याजाचे दर अपरिवर्तित ठेवले असले, तरी महागाईविरोधातील लढा अंतिम टप्प्यांत असल्याचे संकेत दिले होते. धोरणात्मक भूमिकेत ‘तटस्थते’कडे वळण घेऊन, व्याजदर कपातीच्या शक्यतेचा मार्ग तिने खुला केला आहे. मध्यवर्ती बँकेसाठी दोन्ही बाजूंनी २ टक्क्यांच्या वध-घटीच्या फरकासह किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांवर सातत्याने राहील, हे पाहण्याचे काम सरकारने सोपवले आहे.

यंदा लांबलेला पाऊस, काढणीपूर्व सरींनी पिकांचे नुकसान आणि खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ या घटकांमुळे खाद्यान्न महागाईचा धोका वाढला असून, तो अतीव चिंतेचा विषय बनला आहे. भाजीपाल्यातील महागाईने १४ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे आणि त्यासह खाद्यतेल, कडधान्ये आणि अंडी यासह काही जिनसांमध्ये निरंतर भाववाढीचा क्रम सुरू आहे. कडधान्ये आणि काही तेलबियांची खरीप पेरणी ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी आहे, ज्यातून त्यांच्या आयातीवरील मदार वाढली आहे, असे केअरएज रेटिंग्जच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा म्हणाल्या.

हेही वाचा >>>Gold Silver Rate Today : दसऱ्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव

घाऊक महागाई १.८४ टक्क्यांच्या पातळीवर

खाद्यवस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सरलेल्या सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईतही वाढ होऊन, ती १.८४ टक्क्यांवर पोहोचली आहे. प्रामुख्याने भाज्यांच्या किमतीत झालेली वाढ ही घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरात वाढीस कारणीभूत ठरली. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उणे ०.०७ टक्का तर यंदा ऑगस्टमध्ये १.३१ टक्के होता.

खाद्यवस्तूंच्या महागाईत ११.५३ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, आधीच्या (ऑगस्ट) महिन्यात ती केवळ ३.११ टक्के होती. टॉमेटोसह, भाज्यांच्या किमतीतील भडका हा सप्टेंबरमध्ये ४८.७३ टक्क्यांवर पोहोचला असून, आधीच्या महिन्यात तो उणे १०.०१ टक्के पातळीवर होता. गेल्या महिन्यात बटाटे आणि कांद्याची महागाई अनुक्रमे ७८.१३ टक्के आणि ७८.८२ टक्के नोंदविण्यात आली. खाद्यवस्तूंच्या किमतींबरोबरीनेच, तयार खाद्य उत्पादने, मोटार निर्मिती, दुचाकी, ट्रेलर, सेमी-ट्रेलर, यंत्रे व उपकरणांची निर्मिती आदी क्षेत्रातही महागाईत वाढ झाली आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflation in food prices hit a nine month high of 5 5 percent print eco news amy